चतारी ग्रामीण रग्णालयातील व्हॅक्सिन चोरी प्रकरण थंडबस्त्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:17 AM2021-03-07T04:17:20+5:302021-03-07T04:17:20+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयातून ७ व्हॅक्सिन कंत्राटी व्हॅक्सिनेटर दीपक सोनटक्के यांनी चोरल्याची संशयास्पद तक्रार ...
खेट्री : पातूर तालुक्यातील चतारी येथील ग्रामीण रुग्णालयातून ७ व्हॅक्सिन कंत्राटी व्हॅक्सिनेटर दीपक सोनटक्के यांनी चोरल्याची संशयास्पद तक्रार वैद्यकीय अधीक्षक स्वप्निल माहोरे यांनी चान्नी पोलिसात दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी केली. परंतु व्हॅक्सिन दीपक सोनटक्के यांनी चोरली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. त्यानंतरचा व्हॅक्सिन चोरी प्रकरणाचा तपास व चौकशी थंडबस्त्यात आहे. आरोग्य विभागाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दीपक सोनटक्के यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये एक व्हॅक्सिन सस्ती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना दिली होती. पोलिसांच्या तपासामध्येसुद्धा व्हॅक्सिन सापडल्या नाहीत. ग्रामीण रुग्णालयातून ७ व्हॅक्सिन चोरी गेल्याची घटना १२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. त्याच दिवशी पोलिसात तक्रार देणे अपेक्षित असताना, सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. १६ फेब्रुवारी रोजी पोलिसात तक्रार देण्यात आली होती. त्या तक्रारीमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर दीपक सोनटक्के यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता. संशयावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अखेर दीपक सोनटक्के यांची ३ मार्च रोजी जामिनावर सुटका झाली. मुलाला फसविण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी दीपकच्या वडिलांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते. परंतु सदर निवेदनाची दखल घेण्यात आली नाही.
संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांची चुप्पी
व्हॅक्सिन चोरी प्रकरणाबाबत संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांशी वारंवार विचारणा केली. परंतु कोणीही बोलायला तयार नाही. लसीच्या कार्यक्रमामुळे परिचारिका व डॉक्टर कंटाळले होते.
चतारी ग्रामीण रुग्णालयात ५ फेब्रुवारीपासून शासकीय कर्मचाऱ्यांना लस देण्याचा कार्यक्रमाला सुरवात झाली होती. परंतु लसीकरण कार्यक्रमामुळे तेथील परिचारिका, डॉक्टर कंटाळले होते. कार्यक्रम पातूरला हलविण्याबाबत दीपकला सांगत होते. याबाबतची माहिती दीपकने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली होती. या कारणामुळे व्हॅक्सिन लंपास करण्यात आल्याचा संशय आहे.
२५ दिवस उलटूनही व्हॅक्सिन सापडल्या नाहीत
व्हॅक्सिन चोरी गेल्याच्या घटनेला २५ दिवसांचा कालावधी उलटला. मात्र अद्यापही व्हॅक्सिन सापडल्या नाहीत. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याऐवजी प्रकरण थंडबस्त्यात टाकण्यात आल्याचे दिसून आहे.