‘व्हॅलिडिटी’च्या गोेंधळात विद्यार्थ्यांची तारांबळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 03:59 PM2018-06-26T15:59:37+5:302018-06-26T16:03:18+5:30
वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रकियेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे शासनामार्फत अद्याप कोणताही आदेश प्राप्त नाही.
- संतोष येलकर
अकोला : महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) सादर करणे आवश्यक असल्याचे शैक्षणिक संस्थांकडून सांगितले जात आहे; मात्र वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रकियेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे शासनामार्फत अद्याप कोणताही आदेश प्राप्त नाही. त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळात ‘व्हॅलिडिटी’साठी विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे.
विज्ञान शाखेतून इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत जात पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते. परंतु, यावर्षीच्या शैक्षणिक सत्रासाठी सुरू झालेल्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासोबतच इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठीही जात पडताळणी प्रमाणपत्र (व्हॅलिडिटी) सादर करणे आवश्यक असल्याचे संबंधित महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे. परंतु, वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारण्यासंदर्भात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे शासनाचे कोणतेही लेखी आदेश अद्याप प्राप्त झाले नाही. महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत २८ जूनपर्यंत आहे. त्यानुषंगाने जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना धावपळ करावी लागत आहे.
तोंडी आदेशानुसार स्वीकारले जात आहेत प्रस्ताव!
वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारण्यासंदर्भात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना अद्याप शासनाचे कोणतेही आदेश प्राप्त नाहीत. परंतु, पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) महासंचालकांनी दिलेल्या तोंडी आदेशानुसार इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून स्वीकारण्यात येत आहेत.
‘या’ अभ्यासक्रमांसाठीही आता ‘व्हॅलिडिटी’आवश्यक!
यापूर्वी बारावी (विज्ञान) उत्तीर्ण झालेल्या आणि वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते; यावर्षी सुरू झालेल्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत मात्र इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठीही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक करण्यात आले. त्यामध्ये बीएड, डीएड, डी-फार्मसी, बी-फार्मसी, विधी शाखा, डायरेक्टर्स आॅफ आर्टस् अंतर्गत अभ्यासक्रम, एम आर्टिटेक्चर, एमबीए,बीबीएम, एमएमएस, हॉटेल मॅनेजमेंट इत्यादी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले जात आहे.
वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारण्याबाबत अद्याप शासनाचे कोणतेही लेखी आदेश प्राप्त नाहीत. ‘बार्टी’ महासंचालकांच्या तोंडी आदेशानुसार विद्यार्थ्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव स्वीकारण्यात येत असून, प्रस्तावांची तपासणी करण्यात येत आहे.
-संजय कदम, सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अकोला.