वंचितने लोकसभेचे ३ उमेदवार जाहीर केले?; खुलासा करत प्रकाश आंबेडकर मविआबद्दल स्पष्टच बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 04:39 PM2024-03-03T16:39:10+5:302024-03-03T16:41:14+5:30
महाविकास आघाडीला विश्वासात न घेता वंचित आघाडीने लोकसभेच्या तीन जागांवर उमेदवारांची घोषणा केल्याचे वृत्त समोर आले होते.
Prakash Ambedkar ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असली तरी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या महाविकास आघाडीतप्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीदेखील सहभागी होण्यासाठी अनुकूल आहे. मात्र जागावाटपाचा पेच कायम असल्याने प्रकाश आंबेडकर यांनी आपण अद्याप महाविकास आघाडीतील घटकपक्ष नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यातच महाविकास आघाडीला विश्वासात न घेता वंचित आघाडीने लोकसभेच्या तीन जागांवर उमेदवारांची घोषणा केल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
"मी अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. मात्र माझ्याव्यतिरिक्त वंचितकडून अन्य कोणत्याही उमेदवाराची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही," असा खुलासा प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे. वंचित आघाडीने अकोल्यासह वर्धा आणि सांगलीसाठी आपला उमेदवार निश्चित केल्याचं बोललं जात होतं. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
"वंचित बहुजन आघाडीच्या वर्धा जिल्हा कमिटीची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी मला पत्र लिहीत एका उमेदवाराचं नाव सुचवलं आणि या जागेसाठी आपण महाविकास आघाडीत आग्रह धरावा, अशी विनंती जिल्हा कमिटीने केली आहे. मात्र जिल्हा कमिटीला उमेदवार ठरवण्याचे किंवा जाहीर करण्याचे अधिकार नाहीत. त्यांनी फक्त नाव सुचवलं आहे," अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. तसंच सांगलीबाबत आम्ही आमची भूमिका ८ मार्च रोजी जाहीर करू, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, "महाविकास आघाडी व्हावी, यासाठी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करू. मात्र महाविकास आघाडी न झाल्यास राज्यात भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा सामना होईल," असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
आघाडीच्या कार्यक्रमांना न जाण्याचे कार्यकर्त्यांना आदेश
प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावरून आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करत महाविकास आघाडीच्या कार्यक्रमांना न जाण्याचं आवाहन केलं आहे. "वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाही. तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये. मी किंवा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणीही सहभागी होऊ नये," अशा सूचना आंबेडकर यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.