जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्याचे ‘वंचित’समोर आव्हान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 12:30 PM2019-05-27T12:30:18+5:302019-05-27T12:31:23+5:30
येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीसमोर राहणार आहे.
- संतोष येलकर
अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्य मिळवित भाजपाने विजय प्राप्त केल्यानंतर अकोला जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील पंचायत समित्या ताब्यात घेण्याचे ‘टार्गेट’ भाजपाने समोर ठेवले आहे. त्यानुषंगाने येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीसमोर राहणार आहे.
गेल्या २५ वर्षांपासून अकोला जिल्हा परिषदेत भारिप बहुजन महासंघाची सत्ता आहे, तसेच सध्या जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, पातूर व बाळापूर या चार पंचायत समित्यांमध्येही भारिप-बमसंची सत्ता आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर झाला. लोकसभा निवडणुकीत ५ लाख ५४ हजार ४४४ मते प्राप्त करून भाजपाचे अॅड. संजय धोत्रे विजयी झाले, तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी २ लाख ७८ हजार ८४८ मते प्राप्त करीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्य घेत विजय मिळविल्यानंतर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपाने आता अकोला जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील पंचायत समित्या ताब्यात घेण्याचे ‘टार्गेट’ समोर ठेवले आहे. या पृष्ठभूमीवर येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील सत्ता कायम राखण्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीसमोर राहणार असल्याचे वास्तव आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी भाजपाने जसे नियोजन केले होते, तसेच नियोजन जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत राहणार आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर लोकसभा जिंकली. आता जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांवरही भाजपाचा झेंडा फडकणार आहे. जिल्हा परिषदेच्या ३५ पेक्षा अधिक जागा जिंकून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचे आमचे ‘टार्गेट’ आहे.
-तेजराव थोरात,
जिल्हाध्यक्ष भाजपा.
गेल्या २५ वर्षांपासून जिल्हा परिषदेत भारिप-बमसंची सत्ता आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचला असून, विकास कामे करण्यात आली. जिल्ह्यातील वंचित घटकांना सत्तेत बसविले. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता कायम राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या ४० जागा प्राप्त करण्याचे आमचे लक्ष्य आहे.
-प्रदीप वानखडे,
जिल्हाध्यक्ष, भारिप-बमसं.