‘वंचित’ च्या जिल्हा कार्यकारिणीसाठी ५० जणांच्या मुलाखती; आज जाहीर होणार कार्यकारिणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:24 PM2019-07-31T12:24:43+5:302019-07-31T12:25:16+5:30
अकोला: वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारिणीसाठी मंगळवारी अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ प्रमुख अॅड. राजेंद्र महाडोळे यांनी मुलाखती घेतल्या.
अकोला: वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारिणीसाठी मंगळवारी अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ प्रमुख अॅड. राजेंद्र महाडोळे यांनी मुलाखती घेतल्या. त्यामध्ये जिल्हा कार्यकारिणीतील विविध पदांसाठी ५० जणांनी मुलाखती दिल्या. बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मुलाखती घेण्यात येणार असून, दुपारी १२ वाजता वंचित बहुजन आघाडीची नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीची नवीन जिल्हा कार्यकारिणी तसेच युवक आघाडीच्या जिल्हा कार्यकारिणीसाठी इच्छुकांच्या मुलाखती पक्षाचे विदर्भ प्रमुख अॅड. राजेंद्र महाडोळे यांनी घेतल्या. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारिणीच्या विविध पदांसाठी ५० जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. बुधवार, ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ वाजता वंचित बहुजन आघाडीची नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. जिल्हा कार्यकारिणीसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीच्या वेळी माजी आमदार हरिदास भदे, माजी मंत्री डॉ.डी.एम. भांडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, ज्ञानेश्वर सुलताने, दीपक गवई, शोभा शेळके, वंदना वासनिक, शंकरराव इंगळे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
युवक आघाडी कार्यकारिणीसाठी १३ जणांच्या मुलाखती!
वंचित बहुजन आघाडी युवक आघाडी जिल्हा कार्यकारिणीसाठी घेण्यात आलेल्या मुलाखतींमध्ये विविध पदांसाठी १३ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असून, दुपारी १२ वाजता युवक आघाडीची नवीन जिल्हा कार्यकारिणीही जाहीर करण्यात येणार आहे.