वंचित : तयारी स्वबळावरच; आघाडीसाठी कोणाचाही प्रस्ताव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 10:41 AM2019-07-16T10:41:36+5:302019-07-16T10:41:42+5:30

अकोला: वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांसाठी स्वबळावर तयारी सुरू केली आहे.

Vanchit bahujan aaghadi will contest own | वंचित : तयारी स्वबळावरच; आघाडीसाठी कोणाचाही प्रस्ताव नाही

वंचित : तयारी स्वबळावरच; आघाडीसाठी कोणाचाही प्रस्ताव नाही

googlenewsNext

अकोला: वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांसाठी स्वबळावर तयारी सुरू केली आहे. आमच्याकडे काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड यांच्याकडून आघाडीसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही तसेच एमआयएमने १०० जागा मागितल्याचे पत्रही मिळाले नाही, अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडी पार्लेमेंटरी बोर्डाचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
अकोल्यातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला पार्लेर्मेंटरी बोर्डाचे सदस्य व प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, रेखा ठाकूर, आमदार बळीराम सिरस्कार, प्रदीप वानखडे, राजेंद्र पातोंडे आदी उपस्थित होते.
अण्णराव पाटील म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत घेतलेली मते लक्षात घेता येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही सत्तेचा भाग असू हा विश्वास निर्माण झाला आहे. राज्यातील २८८ मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून, सोमवारी विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. एमआयएमने १०० जागा मागितल्या असल्या संदर्भात विचारणा केली असता असे कोणतेही पत्र एमआयएमकडून आलेले नाही, असा खुलासा करतानाच एमआयएम हा आमचा घटक पक्ष असून, त्यांच्यासोबत जागा वाटपाची चर्चा सुरळीत होईल. कुठलाही वाद होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. कोणत्याही पक्षाने आघाडीसाठी आमच्याकडे प्रस्ताव दिलेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह समविचारी पक्ष सोबत येतील तर आनंदच आहे; मात्र त्यासाठी आम्ही आमच्या धोरणांना आणि स्वाभिमानाला सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
...तरच काँग्रेससोबत आघाडी
काँग्रेसच्या नेत्यांची आघाडीसंदर्भातील विधाने ही फक्त माध्यमांमध्येच आहेत. काँग्रेसला आघाडी करायची असेल तर त्यांनी सर्वात आधी आम्ही भाजपाची ‘बी टीम’ कसे आहोत हे सिद्ध करावे अन्यथा आम्हाला मतदान करणाऱ्या ४१ लाख मतदारांची माफी मागावी. नंतरच आघाडीचा प्रस्ताव द्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले.
 
लक्ष्मण मानेंसोबत मनभेद नाहीत
लक्ष्मण माने यांनी वंचित बहुजन आघाडीवर केलेली टीका ही मतभेदाचा प्रकार आहे. संघटनेत मतभेद असू शकतात; मात्र त्यांच्यासोबत आमचे मनभेद नाहीत. काँग्रेससोबत आघाडी करावी ही त्यांची सूचना चांगली आहे; मात्र त्यासाठी स्वाभिमान सोडून काँग्रेससोबत जाणे कदापि मान्य नाही. सूचना करणे, मत मांडणे हे योग्यच आहे; मात्र त्यासाठी आग्रह धरणे चुकीचे असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.
 

 

Web Title: Vanchit bahujan aaghadi will contest own

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.