‘लॉकडाऊन’च्या यात्रेत राजकारणाची ‘कावड’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:08 AM2020-08-17T10:08:09+5:302020-08-17T10:08:49+5:30
वंचित बहुजन आघाडीने या मुद्यावर राजकीय उडी घेऊन नव्या राजकारणाचे रणशिंग फुंकले आहे.
- राजेश शेगोकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अवघ्या आठ दिवसांपूर्वी अयोध्येत राममंदिराचे भूमिजूजन झाले अन् गेल्या तीन दशकांपासून देशाच्या राजकारणात केंद्रबिंदू झालेला मंदिर हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. आता अकोल्यातही मंदिर हाच मुद्दा राजकीय सारीपाटावर येऊ घातला आहे. निमित्त झाले ते अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वराच्या कावड यात्रेचे. कोरोनाच्या संकटामुळे मंदिर बंद आहे व कावड यात्राही मर्यादित करण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर झाला असताना वंचित बहुजन आघाडीने या मुद्यावर राजकीय उडी घेऊन नव्या राजकारणाचे रणशिंग फुंकले आहे.
अकोल्यातील कावड यात्रा महोत्सव पंचक्रोशीचा लोकोत्सव झाला आहे. संपूर्ण देशात श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी होणारी एकमेव यात्रा आहे. पूर्णामायच्या जलाने राजराजेश्वरला अभिषेक घालण्याची ही परंपरा या वर्षी कोरोनाच्या साथीमुळे धोक्यात आली. गेल्या २४ मार्चपासून देशभरातील मंदिरे व धार्मिक स्थळे बंद आहेत. त्याला राजराजेश्वराचे मंदिरही अपवाद नाही. यावर्षी होणारी कावड यात्रा ही प्रातिनिधिक स्वरूपाची राहील, असा निर्णय घेण्यात आला आहे. या पृष्ठभूमीवर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरे उघडा हा मुद्दा हाती घेऊन थेट राजराजेश्वराचे मंदिरच गाठले. गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडून त्यांनी हात जोडून दर्शनही घेतले अन् कावड यात्रेबाबत शासन व प्रशासनाशी बोलून निर्णय घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. खरे तर असे आश्वासन देणे हे राजकारणात नवीन नाही; मात्र अॅड. आंबेडकरांनी थेट राजराजेश्वराचे मंदिर गाठण्यामुळे या घटनेला राजकीय क्षेत्रात गांभीर्याने घेतले जात आहे.
मुळातच अकोल्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष हा एकहाती वर्चस्व मिळविणारा पक्ष आहे. त्यातही अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्लाच. या मतदारसंघातील प्रत्येक धार्मिक कार्यक्रम हा भाजपाच्या प्रभावाखालीच होत आला आहे. कावड यात्रा महोत्सव या कार्यक्रमांमधील सर्वात मोठा कार्यक्रम. अशा स्थितीत हा मुद्दा भाजपाने आक्रमक पद्धतीने हाताळण्याची अपेक्षा असताना अॅड. आंबेडकर यांनी यामध्ये थेट मंदिर गाठल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारीच बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडून प्रातिनिधिक स्वरूपात लोकभावनेला हात घालण्याची संधी असतानाही भाजपाने व शिवसेनेने ही संधी सोडली; मात्र या निमित्ताने अॅड. आंबेडकर यांनी आपण हिंदूविरोधी नसल्याचेही संकेत देण्याची संधी घेतली. खरे तर अॅड. आंबेडकरांनी लॉकडाऊनमध्ये इतर पक्षांनी दुर्लक्षित केलेल्या सर्वच प्रश्नांवर आवाज उठवला, नाभिक समाज, फेरीवाले, आदिवासी, मजूर, लहान-मोठे व्यावसायिक यांच्या उदरनिर्वाहाची सोय झाली पाहिजे म्हणून लॉकडाऊन विरोधात भूमिका घेतली व आता राज्यभरातील मंदिरांबाबत ते पुढे आले आहेत. केवळ कोरोनाच्या नावाखाली धार्मिक सण, उत्सव व परंपरा खंडित होऊ नये ही त्यांनी घेतलेली भूमिका वंचितच्या सामाजिक अभियांत्रिकीचे नवे पाऊल आहे. त्याचा राजकीय लाभ वंचितला किती मिळेल, हे काळच ठरवेल; मात्र वंचितसाठी लोकभावनेचा कोणताच मुद्दा अस्पृश्य नाही, हे या निमित्ताने त्यांनी अधोरेखित केले.