‘वंचित’ची मते वाढली; पण विजयाचा बुरूज ढासळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 02:18 PM2019-10-26T14:18:06+5:302019-10-26T14:18:16+5:30
गत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यात ‘वंचित’ची मते वाढली असली तरी एकही आमदार निवडून आला नसल्याने, विजयाचा बुरूज मात्र ढासळला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गत २५ वर्षांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील एक-दोन मतदारसंघात भारिप बहुजन महासंघाने (वंचित बहुजन आघाडी) विजय मिळविला आहे; मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे गत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यात ‘वंचित’ची मते वाढली असली तरी एकही आमदार निवडून आला नसल्याने, विजयाचा बुरूज मात्र ढासळला आहे.
गत १९९४ ते २०१४ या २५ वर्षांच्या कालावधीत झालेल्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये भारिप बहुजन महासंघाने (वंचित बहुजन आघाडी) जिल्ह्यातील एक ते दोन मतदारसंघात विजय मिळविला. त्यामुळे सतत २५ वर्षे जिल्ह्यात या पक्षाचे एक-दोन आमदार राहिले आहेत. त्यामध्ये १९९४ मध्ये मूर्तिजापूर मतदारसंघातून मखराम पवार, १९९९ मध्ये बोरगाव मंजू मतदारसंघातून डॉ. डी. एम. भांडे व अकोट मतदारसंघातून रामदास बोडखे, २००४ मध्ये बोरगाव मंजू मतदारसंघातून हरिदास भदे, २००९ मध्ये अकोला पूर्व मतदारसंघातून हरिदास भदे व बाळापूर मतदारसंघातून बळीराम सिरस्कार आणि २०१४ मध्ये बाळापूर मतदारसंघातून बळीराम सिरस्कार विजयी झाले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला विजय मिळविता आला नाही. अकोट, बाळापूर, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या चार मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी अटीतटीची लढत देत दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांमध्ये ५५ हजार ६५८ मतांची वाढ झाली असून, गत लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत १२ हजार ९६ मतांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची मते वाढली असली तरी गत २५ वर्षांनंतर या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात ‘वंचित’चा एकही आमदार निवडून आला नसल्याने, विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीच्या विजयाचा बुरूज मात्र ढासळल्याचे वास्तव आहे.
२०१४ च्या निवडणुकीत
अशी मिळाली होती मते!
४२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत भारिप बहुजन महासंघाला (वंचित बहुजन आघाडी) १ लाख ९० हजार २७९ मते मिळाली होती.
४त्यानंतर गत लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला २ लाख ३३ हजार ८४१ मते मिळाली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पाचही मतदारसंघांत ‘वंचित’ला २ लाख ४५ हजार ९३७ मते मिळाली.
गत विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या मतांमध्ये वाढ झाली. अपेक्षेप्रमाणे विजय मिळाला नसून, पाचही मतदारसंघांत पराभव झाला. त्यामध्ये अकोट, बाळापूर, अकोला पूर्व व मूर्तिजापूर चार मतदारसंघांत महाआघाडीमुळे वंचित बहुजन आघाडीचा पराभव झाला आहे.
-राजेंद्र पातोडे,
प्रदेश प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी.