शहिदांना ‘वंदेमातरम्’ स्वर श्रद्धांजली शुक्रवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 01:30 PM2019-03-10T13:30:31+5:302019-03-10T13:30:44+5:30
अकोला: पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शुक्रवार, १५ मार्च रोजी स्वरांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वंदेमातरम् स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अकोला: पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना शुक्रवार, १५ मार्च रोजी स्वरांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वंदेमातरम् स्वरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाणार असल्याची माहिती यावेळी प्रदीप गुरुखुद्दे यांनी दिली.
वंदेमातरम् स्वरांजली कार्यक्रमासंदर्भात शनिवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी अॅड. मुकुंद जालनेकर, संजीव देशमुख, आरती टाकळकर यांची उपस्थिती होती. जिल्हा मुद्रक संघ व अकोला आर्ट सोसायटी आणि प्रमिलाताई ओक ग्रंथालय यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शुक्रवार, १५ मार्च रोजी शहिदांना स्वरांच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रदीप देशमुख, राम भारती, स्मिता डवले, आनंद जहागीरदार, नंदकिशोर दाभाडे, श्याम कपले, नंदकिशोर पाटील, हर्षवर्धन फुलझेले, वर्षा कडोळे आदी स्थानिक कलावंत आपल्या सुमधुर स्वरांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी नि:शुल्क खुला राहणार आहे. यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील शहीद जवान नितीन राठोड आणि मलकापूर येथील शहीद जवान संजय राजपूत यांच्या कुटुंबीयांना भविष्यनिर्वाह देण्याचा प्रयत्न असल्याचा यावेळी त्यांनी सांगितले. या मदतीसाठी ज्या नागरिकांना सहकार्य करायचे असेल, त्यांनी कार्यक्रमादरम्यान मदत निधी द्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.