वाराणसी, मथुरा, अयोध्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:31 AM2021-05-05T04:31:33+5:302021-05-05T04:31:33+5:30
वाराणसी, मथुरा, अयोध्या जिल्ह्यांत भाजपला धक्का ----------------------------- पंचायत निवडणूक : राज्य सरकारचे या तीन जिल्ह्यांवर विशेष लक्ष होते लखनौ ...
वाराणसी, मथुरा, अयोध्या
जिल्ह्यांत भाजपला धक्का
-----------------------------
पंचायत निवडणूक : राज्य सरकारचे या तीन जिल्ह्यांवर विशेष लक्ष होते
लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये पंचायत निवडणुकीच्या निकालांनी सत्तारूढ योगी आदित्यनाथ सरकारला मोठा धक्का बसला आहे. भाजप सरकारसाठी महत्त्वाच्या असलेल्या वाराणसी, अयोध्या आणि मथुरा या जिल्ह्यांत समाजवादी पक्षाने ३९ जागा जिंकून मोठे यश मिळवले, तर भाजपला फक्त २४ जागा जिंकता आल्या आहेत. योगी सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात या तीन जिल्ह्यांवर विशेष भर होता. वाराणसीत विधान परिषद निवडणुकीनंतर आता पंचायत निवडणुकीतही भाजपला मोठा धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत जिल्हा पंचायतच्या ४० जागांपैकी भाजपला फक्त आठ जागा मिळाल्या आहेत. समाजवादी पक्षाने १४, तर बहुजन समाज पक्षाने पाच जागा जिंकल्या. अपना दलला (एस) तीन, आम आदमी पक्ष आणि सुभासपाला प्रत्येकी एकेक जागा मिळाली आहे. तीन अपक्ष निवडून आले आहेत.
मथुरेत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने १२, अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलने नऊ जागा जिंकल्या. भाजपला फक्त आठ जागा मिळाल्या. समाजवादी पक्षाला एक जागा जिंकता आली. तीन अपक्ष निवडून आले. काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. याच पट्ट्यात शेतकऱ्यांनी कृषी आंदोलनाच्या विरोधात निदर्शने केली होती.
अयोध्या जिल्ह्यात ४० जिल्हा पंचायत जागांपैकी २४ समाजवादी पक्षाने तर भाजपने सहा जागा जिंकल्या. राहिलेल्या जागा अपक्षांनी जिंकल्या. या जिल्ह्यात जवळपास एक डझन भाजप नेत्यांना तिकिटे न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली होती.
------------