वऱ्हाडातील जलसाठा पोहोचला ६० टक्क्यांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:36 PM2018-08-31T12:36:11+5:302018-08-31T12:38:30+5:30
अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांत धरणातील साठा ६० टक्क्यांपर्यंत पोहोचला. बुलडाणा जिल्ह्यातील धरणात अद्यापही अल्प जलसाठा आहे. खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच असल्याने या जिल्ह्यातील शेतकरी, नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये ३० आॅगस्ट रोजी ५९.०२८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ८८.२५ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. हा साठा ९५ टक्केपर्यंत पोहोचल्यास विसर्ग करावा लागणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्याचे म्हणणे आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात १०० टक्के जलसाठा संकलित झाला असून, उमा १००, मोर्णा धरणात ४९.७१ टक्के, तर वान धरणात आतापर्यंत ८६.७८ टक्के जलसाठा संकलित आहे. बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी मध्यम धरणातील जलसाठा ६.२८ टक्के आहे. तोरणा १४.३२, तर उतावळी धरणातील पातळी ३५.८३ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १७.३१ टक्के, पेनटाकळी धरणात १७.११ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १९.९८ टक्के, पलढगमध्ये २५.५७ टक्के, मन धरणात २४.०३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ९२ टक्के, एकबुर्जी व सोनल धरणात १०० टक्के जलसाठा आहे. एकूणच बुलडाणा जिल्ह्याची स्थिती अद्याप सुधारली नाही.
अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा धरणात ४७.३२ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील १०० पूसमध्ये, अरुणावती ९१.५९ तर बेंबळा धरणात ६०.७७ टक्केच जलसाठा आहे.