तांत्रिक कारणामुळे वसंत देसाई तरणतलाव पुन्हा बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 03:43 PM2019-05-21T15:43:04+5:302019-05-21T15:43:13+5:30
शहरात एकमेव असलेला तरणतलाव परत दोन दिवसांसाठी तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात आला आहे.
अकोला: पाच-सहा महिने दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेला तरणतलाव अर्ध्यावर उन्हाळा आल्यानंतर सुरू करण्यात आला होता; मात्र एक महिनाही उलटायच्या आत शहरात एकमेव असलेला तरणतलाव परत दोन दिवसांसाठी तांत्रिक कारणामुळे बंद करण्यात आला आहे.
२१ व २२ मे रोजी तांत्रिक कारणामुळे तरणतलाव बंद करण्यात आला असल्यामुळे जलतरणपटूंमध्ये नाराजी पसरली. पहिलेच उन्हाळ्याचा अर्धा मोसम संपल्यानंतर तरणतलाव सुरू करण्यात आला. त्यात प्रत्येक शासकीय सुटीच्या दिवशी तलाव बंद करण्यात येतो. तसेच दर रविवारी तरणतलाव बंद असतो. उन्हाळ्याच्या दिवसातच तलाव बंद करण्यात येतो तर शुल्क भरू नही फायदा काय, अशी संतप्त प्रतिक्रिया सोमवारी लोकमतजवळ जलतरणपटूंनी व्यक्त केली.
यासंदर्भात प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांच्याशी संवाद साधला असता, तरणतलावाच्या पाण्यात क्लोरिनचे प्रमाण जास्त झाले आहे. एका स्विमरला यामुळे त्रास झाला. यामुळे इतरही स्विमर्सला काही अपाय होऊ नये. विनाकारण कोणाला त्रास होऊ नये, यासाठी तातडीने पाणी बदलविण्याचे काम सुरू केले. क्लोरिनचा एक उचित प्रवाह प्रमाण राखणे आवश्यक असते. तसेच सक्शन मशीन खराब झाली आहे. मशीनची दुरुस्ती करू न पाणी स्वच्छ करण्यात येणार असल्याचेदेखील कुळकर्णी यांनी सांगितले.
पालकांना तलाव परिसरात प्रवेश
पालकांना तरणतलाव परिसरात थांबण्याची सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी बंदी घातली होती. आता मात्र ही बंदी उठविण्यात आली असून, केवळ महिलांच्या बॅचच्या वेळी गॅलरी बंद ठेवण्यात येते, असेदेखील कुळकर्णी यांनी सांगितले.
‘‘मशीन दुरुस्तीसाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. हा दोन दिवसांचा कलावधी सर्व स्विमर्सला वाढवून देण्यात येणार आहे.’’
गणेश कुळकर्णी
प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी