कराड येथील अपघातात वसंतबाबू खंडेलवाल जखमी

By admin | Published: April 12, 2017 01:59 AM2017-04-12T01:59:31+5:302017-04-12T01:59:31+5:30

अकोला: कराड येथे सोमवारी दुपारी झालेल्या कार, दुचाकी व ट्रकच्या तिहेरी अपघातात अकोल्यातील प्रख्यात उद्योजक वसंतबाबू खंडेलवाल यांच्यासह पाच जण गंभीर जखमी झाले.

Vasantbab Khandelwal injured in Karad accident | कराड येथील अपघातात वसंतबाबू खंडेलवाल जखमी

कराड येथील अपघातात वसंतबाबू खंडेलवाल जखमी

Next

तिहेरी अपघात : कार, ट्रक, दुचाकीची धडक

अकोला: सातारा जिल्ह्यातील कराड येथे सोमवारी दुपारी झालेल्या कार, दुचाकी व ट्रकच्या तिहेरी अपघातात अकोल्यातील प्रख्यात उद्योजक वसंतबाबू खंडेलवाल यांच्यासह पाच जण गंभीर जखमी झाले. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाक्यानजीक हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कार व दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. वसंतबाबू हिरालाल खंडेलवाल (वय ७४) त्यांच्या पत्नी शारदा वसंतबाबू खंडेलवाल (वय ६७), तसेच वाशिम येथील लाल बहादूर सोसायटीमध्ये राहणारे एन. नरेंद्रन (वय ७४) व त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मी एन. नरेंद्रन (६७) यांच्यासह आनंदा गौतम बसवंत (२८, रा. कोल्हापूर नाका, मलकापूर) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.
खंडेलवाल दाम्पत्य व नरेंद्रन दाम्पत्य हे वसंतबाबू खंडेलवाल यांच्या कारने (एमएच ३० ईएफ ११६१) सोमवारी दुपारी पुण्याच्या दिशेने निघाले होते. वसंतबाबू खंडेलवाल हे स्वत: कार चालवित असताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर नाक्यानजीक त्यांचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कारची समोर निघालेल्या दुचाकीला (एमएच ११ एडी २१८५) धडक बसली. या धडकेनंतर कारसह मोटारसायकल कोल्हापूर नाक्यावरून हायवेवर येण्याच्या प्रयत्नात असलेल्या मालट्रकला (एमएच ११ एफ ४२४७) धडकली. कार व मालवाहू ट्रकच्या मध्ये मोटारसायकल सापडल्याने या अपघात मोटारसायकलस्वार आनंदा बसवंत हा गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तसेच अपघाताबाबत कऱ्हाड शहर पोलिसांत माहिती देण्यात आली. शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने त्या ठिकाणी पोहोचले. कारचा चक्काचूर झाल्याने जखमी त्यामध्येच अडकून पडले होते. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना कारमधून बाहेर काढून तातडीने उपचारार्थ कृष्णा रुग्णालयात हलवले. हा अपघात एवढा भीषण होता की, परिसरात काचांचा खच पडला होता. दुचाकीसह कारचाही अपघातात चक्काचूर झाला आहे.

रबर स्टॉपर असूनही वाहने भरधाव
कोल्हापूर नाक्यावरील अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता काही महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी रबर स्टॉपर तयार करण्यात आले आहेत. या स्टॉपरमुळे वाहनांचे वेग कमी होईल, अशी अपेक्षा होती; मात्र स्टॉपर असूनही चालक वेग कमी करीत नसल्याचे अनेक वेळा दिसून येते. भरधाव वेगामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

 

Web Title: Vasantbab Khandelwal injured in Karad accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.