वीरपुत्र दादाराव घोडेस्वार अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 08:56 PM2018-08-18T20:56:56+5:302018-08-18T20:59:43+5:30
सैन्यात वीरचक्र मिळवणारे येथील रहिवासी दादाराव घोडेस्वार यांच्या पार्थिवावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दादाराव यांनी 17 ऑगस्टला दुपारी अखेरचा श्वास घेतला, ते 86 वर्षांचे होते.
चांदूर बाजार (अमरावती) : सैन्यात वीरचक्र मिळवणारे येथील रहिवासी दादाराव घोडेस्वार यांच्या पार्थिवावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दादाराव यांनी 17 ऑगस्टला दुपारी अखेरचा श्वास घेतला, ते 86 वर्षांचे होते. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध दोन लढायांमध्ये तसेच चीनविरुद्ध देशाच्या सीमेवर पराक्रम गाजविला होता. ठाणेदार अजय आकरे, तहसीलदार शिल्पा बोबडे, अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू, काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी सकाळी दादाराव घोडेस्वार यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली वाहिली.
दादाराव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत, अशी मागणी अंतिम संस्कारात उपस्थित माजी सैनिक व नागरिकांनी आ. बच्चू कडू यांच्याकडे केली. आ. कडू यांनी जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क करून दादारावजी घोडेस्वार यांच्यावर अंतिम संस्कार शासकीय इतमामात करण्याची मागणी केली. अखेर अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या पथकाने उपस्थित होऊन घोडेस्वार यांना श्रद्धांजली वाहिली. पुलगाव येथील भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनीही श्रद्धांजली वाहिली, पोलीस उपनिरीक्षक शरद भस्मे यांच्या हस्ते मृतदेहावरील तिरंगा दादाराव घोडेस्वार यांच्या पत्नीकडे सोपविण्यात आला. अनेक शासकीय प्रतिनिधी आणि राजकारणी याप्रसंगी उपस्थिती होते.
दादाराव घोडेस्वार यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व बराच आप्तपरिवार आहे. दादराव घोडेस्वार यांना त्याच्या मुलाने भडाग्नी दिला. त्याआधी शासकीय प्रतिनिधी म्हणून तहसीलदार बोबडे, आ. कडू यांनी श्रद्धांजली वाहिली. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात प्लाटून कमांडर असलेले दादाराव घोडेस्वार यांनी 12 डिसेंबरच्या रात्री शत्रूने तयार केलेला 600 मीटरचा सुरुंग पार केला. त्यांच्यावर पाकी सैन्याने हल्ला केला तेव्हा दारूगोळा संपण्याच्या स्थितीत त्यांनी बंदुकीपुढील कट्यारीने शत्रुसैन्यांचा खात्मा केला. याबद्दल 15 ऑगस्ट 1972 रोजी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते वीरचक्र प्रदान करण्यात आले होते.