आवक मंदावल्याने भाजीपाला महागला!
By admin | Published: July 17, 2017 03:11 AM2017-07-17T03:11:30+5:302017-07-17T03:11:30+5:30
टॉमेटो, कोथिंबीर, हिरवी मिरचीचे दर वाढले!
अकोला : भाजी बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाल्याचा परिणाम घरातील बजेटवरसुद्धा होत आहे. आवक कमी झाल्यामुळे बाजारातील भाजीपाला चांगलाच महागला आहे. टॉमेटो, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे दर आसमंताला भिडले आहेत. त्यामुळे टॉमेटो, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा ठेचा सध्यातरी जेवणातून बाद झाला आहे.
पावसाला सुरुवात झाल्यानंतर भाजीपाल्याची आवक वाढेल, अशी अपेक्षा होती; परंतु भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर चांगलेच वधारले आहेत. एक महिन्यांपूर्वी १० ते २० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या टॉमेटोचे भाव ८० ते १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कोथिंबीर, हिरव्या मिरचीचे दर तर एवढे वाढले आहेत, की सर्वसामान्य नागरिकाला त्या घेणेही परवडत नसल्याचे चित्र बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. कोथिंबीर व हिरवी मिरची १०० ते १२० रुपये किलो दराने विकल्या जात आहे. शहरातील महात्मा फुले जनता भाजी बाजारामध्ये गत आठवड्यापासून भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. रोजच्या स्वयंपाकात समावेश असलेल्या टॉमेटो, कोथिंबीरची आवक मोजकीच असल्याने नागरिकांना महागडी भाजी खरेदी करणे अवघड जात आहे. गृहिणी तर टॉमेटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, गवार, भेंडीसारख्या भाज्या सध्या घेणे टाळत आहेत. शहरात राज्यातील काही भागातून आणि ग्रामीण भागातून पालक, भेंडी, ढेमसे, लवकी, बरबटी, टॉमेटो, वांगी आदी भाजीपाला येतो. सध्या भाजीपाल्याची बाजारपेठेतील आवक मंदावल्यामुळे त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर होत असल्याचे एका कमिशन एजंटने सांगितले. दोन आठवड्यांपूर्वी टॉमेटोचे भाव ३० ते ४० रुपये किलो होते; परंतु आता अचानक टोमॅटोंचे दर ८० ते १०० रुपये किलोवर आले आहेत.