भाव कोसळल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:17 AM2021-03-15T04:17:43+5:302021-03-15T04:17:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आठवडा बाजारांवर बंदी घालण्यात आली आहे. बाजार बंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आठवडा बाजारांवर बंदी घालण्यात आली आहे. बाजार बंद असल्याने ग्राहक मिळत नाहीत, त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. शहरातील बाजारपेठेत कांद्याची आवक घटल्याने कांद्याचे दर वाढले आहेत.
गत आठवड्यापासून कांद्याची आवक वाढली होती. त्यामुळे कांद्याचे भाव १० रुपयांनी कमी झाले. बाजारात नव्याने दाखल झालेल्या ढेमशांचे भाव ५० रुपयांवर गेले आहेत तसेच इतर भाज्यांचे दर कायम आहेत. हिरवी मिरची ४० रुपये किलो, वांगी ३० रुपये किलोवर पोहोचली आहेत. आवक घटल्याने मेथी, पालकचे दरही वाढले आहेत. फळ बाजारात सफरचंद, मोसंबी, संत्रे आदी फळांची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने दर जवळपास दुप्पट झाले आहेत. किराणा साहित्यामध्ये तेलाचे दर गेल्या आठवड्यापेक्षा वाढले आहेत. तसेच महाशिवरात्री उत्सवामुळे साबूदाणा, शेंगदाणे आदींच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. टरबूज व खरबूजची आवक वाढल्याने भाव कोसळले आहेत.
------------------------------
टरबूज, खरबुजांची आवक वाढली!
गतवर्षी चांगला पाऊस बरसल्याने यंदा मुबलक पाणी उपलब्ध असल्याने अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी टरबूज, खरबुजाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. साधारणत: जानेवारी महिन्यात टरबुजाची लागवड करण्यात येते; मात्र अनेक शेतकऱ्यांनी लागवड केल्याने टरबुजाची आवक वाढली आहे. टरबूज २० रुपये तर खरबूज ३० रुपये किलोप्रमाणे विकले जात आहेत.
------------------------------------------------------------
टरबुजाची थेट विक्री!
कृषी विभागाने सुरू केलेल्या योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूज, खरबुजाची थेट विक्री सुरू केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी टरबुजाची दुकाने लावली आहेत तसेच इतर भागातही ट्रॅक्टरने माल घेऊन शेतकरी विक्री करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत असल्याचे चित्र आहे.
--------------------------------------------------
कांद्याची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत. नव्याने बाजारात आलेल्या भाज्यांचे भाव वाढलेले आहेत. इतर भाज्यांचे दर कायम आहेत.
- सागर राऊत, भाजी विक्रेता.