भाजीपाल्याचे भाव कडाडले
By admin | Published: June 28, 2014 01:40 AM2014-06-28T01:40:04+5:302014-06-28T01:42:09+5:30
पावसाच्या दडीने अकोला बाजारपेठेत तेजी; महागाईचा भडका.
विवेक चांदूरकर / अकोला
मृग नक्षत्र सुरू होऊन एक महिना उलटला असला तरी पाऊस पडला नसल्यामुळे बाजारपेठ प्रभावित झाली आहे. डाळींसह कडधान्याच्या भावात १0 टक्क्यांनी तेजी आली असून, भाजीपाल्याचे भाव तर दुपटीने वाढले आहेत. या महागाईमुळे सामान्य नागरिक होरपळून निघत आहे.
पावसाच्या दडीमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. पाणीच नसल्यामुळे बाजारपेठेतील भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. अकोल्यात पुणे, मध्य प्रदेश, अमरावती, बुलडाणा, खामगाव, नाशिक, इंदूर येथून भाजीपाला येतो. सध्या मात्र अमरावती, नाशिक व खामगाव येथूनच भाजीपाला येत आहे. त्यातही मागणीच्या तुलनेत भाजीपाला कमी येत असल्यामुळे व्यापारी व दलाल यांनी याचा फायदा घेऊन भाजीपाल्याच्या भावात प्रचंड वाढ केली आहे. एक महिन्यापूर्वी ८0 रुपये किलो असलेल्या सांभाराच्या भावात दुपटीने वाढ होऊन आता १८0 रुपये किलो झाला आहे, तर पालक, टमाटर, वांग्याच्या भावातही दुपटीनेच वाढ झाली आहे. भाजीपाल्यासोबतच फळांवर पाऊस न येण्याचा प्रभाव पडला आहे. बाजारात चिकू मिळणे दुरापास्त झाले असून, ६0 रुपये किलो असलेले चिकू १00 ते १२0 रुपये किलो दराने मिळत आहेत, तर २0 रुपये किलोने मिळणारी मोसंबी आता ७0 रुपये किलो झाली आहे.