चंदनाची तस्करी करणा-या वाहनास पकडले
By admin | Published: August 26, 2015 01:36 AM2015-08-26T01:36:45+5:302015-08-26T01:36:45+5:30
आरोपीवर गुन्हा दाखल; अकोलानजिकची घटना.
मेडशी (वाशिम) : एका वाहनात चंदनाची तस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीवरुन गस्त लावली असता वाहनाने वनविभागाच्या अधिकार्यांना चकमा देऊन फरार होण्यात यश मिळविल्याची घटना २४ ऑगस्टला घडली होती. अधिकार्यांनी वाहनाचा नंबर पाहून घेतल्याने २५ ऑगस्ट रोजी वाहनासह आरोपीस अटक करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रोदशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार २४ ऑगस्ट रोजी वनविभागाला प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे एका वाहनात चंदन चोरुन नेल्या जात असल्याच्या माहितीवरुन अधिकारी व कर्मचारी यांनी शासकीय जीपने मेडशी - डोंगरकिन्ही रस्त्यावर गस्त लावली. डोंगरकिन्ही, चांडस, केनवड, कुकसा फाटा येथून परत त्याच मार्गावर डोंगरकिन्ही ते मेडशी रोडवर गस्त करीत असताना एका ओमणी गाडीने कट मारुन गाडी पळवून नेली. गाडी पळवून नेत असताना गाडीत असलेल्या चंदनाचे पोते फेकून दिले. अधिकार्यांनी चंदन जप्त केले . यावेळी पथकातील एका अधिकारी याने ओमनी गाडीचा क्रमांक एम.एच.२0 ए .जी.४९८४ नोंदून घेतला. २५ ऑगस्ट रोजी या घटनेची चौकशी करीत असताना सदर वाहन पातुर ते अकोला रस्त्याने जात असल्याची माहिती मिळाली. यावरुन वनविभागाच्या अधिकार्यांनी अकोला पोलीस पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक एस.के.जाधव यांना सोबत घेऊन त्यांच्यासह वनपरिक्षेत्रातील क्षेत्रसहायक आर.एस.कातखेडे वनरक्षक यांनी अकोला जवळील एका हॉटेलसमोर वाहन ताब्यात घेतले. सदर वाहनावर शे.रशीद शे.महमद ३५ वष्रे रा. पातुर चालक होते. यांच्यावर वनअधिनियम १९२७ कलम २६(१) फ ४१, ४२, भादंवि ३७९, ३४, १२0 ब प्रमाणे वनअपराध क्रमांक २१/१२ नुसार गुन्हा नांदविण्यात आला आहे. फरार झालेल्या चार संशयितांचा शेध सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी राम खोपडे यांनी दिली.