भरधाव वाहनाची दोन दुचाकींना धडक; महिला ठार, ३ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 05:33 PM2022-10-04T17:33:55+5:302022-10-04T17:34:52+5:30
शेगावला दर्शनासाठी दोन दुचाकींना जबर धडक दिली. यात चार जण जखमी झाले. यापैकी जखमी महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.
अकोला - बाळापूरजवळील शेगाव रस्त्यावर भरधाव चारचाकी वाहनाने शेगावला दर्शनासाठी दोन दुचाकींना जबर धडक दिली. यात चार जण जखमी झाले. यापैकी जखमी महिलेचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. बाळापूर पोलिसांनी एमएच ०३ सीबी १७३५ क्रमांकाच्या वाहन चालकाविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला.
अकोल्यातील शिवर येथे राहणारे सेवकराम महादेव बगाडे (५६) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा सतीश व पत्नी मंजुषा बगाडे व शेजारी राहणारे योगिता रामकृष्ण वैराळे एमएच ३० बीई २९७० क्रमांकाच्या दुचाकीवर बसून ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेगावकडे निघाले. त्यांच्यासोबत साडू दिनेश महादेव मोरे, त्यांची पत्नी मंगला मोरे हेसुद्धा एमएच ३० यू. ६४५१ क्रमांकाच्या दुचाकीवर होते. दोन्ही दुचाकींवर पाच जण बाळापुरच्या हद्दीमध्ये शेगावकडे जाताना, बाळापूरकडे भरधाव येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या एमएच ०३ सीबी १७३५ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने दिनेश मोरे यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर, सतीश बगाडे याच्याही दुचाकीला धडक दिली.
सतीश, मंजुषा बगाडे व योगिता रामकृष्ण वैराळे यांच्यासह दिनेश मोरे व मंगला मोरे हे दोघेही जखमी होऊन रस्त्याच्या बाजूला पडले. त्यांना लोकांनी रुग्णवाहिकेमध्ये टाकून ग्रामीण रुग्णालय बाळापूर व पुढील उपचाराकरिता सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे उपचारासाठी भरती केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना, दुपारी सायंकाळी सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना, मंगला दिनेश मोरे हिचा मृत्यू झाला. या प्रकरणात बाळापूर पोलिसांनी वाहन चालकाविरूद्ध भादंवि कलम २७९, ३०४ अ, ३३७ नुसार गुन्हा दाखल केला.