आरओबीवरून धावताहेत वाहने; अकोटपर्यंत रेल्वे कधी जाणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2022 12:55 PM2022-02-01T12:55:40+5:302022-02-01T12:57:26+5:30
Train to Akot : अकोला ते अकोटपर्यंतच्या मार्गावर तरी रेल्वेगाडी धावावी, अशी अपेक्षा अकोट शहर व तालुक्यातील जनतेची आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला : अकोट येथील रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी) तयार होत नाही, तोपर्यंत अकोटपर्यंत रेल्वे गाडी सोडली जाऊ शकत नाही, असे दक्षिण-मध्य रेल्वेचे नांदेड विभागीय व्यवस्थापक उपविंदर सिंग यांनी स्पष्ट केले होते. आता या पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, अकोला ते अकोट रेल्वेगाडी कधी धावणार, असा प्रश्न अकोटकरांना पडला आहे.अकोला ते खंडवा गेज परिवर्तन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या अकोला ते अकोटपर्यंतच्या ४५ कि.मी. लांबीच्या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर झाले आहे. गेज परिवर्तन होऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटूनही या मार्गावरून रेल्वेगाडी धावली नाही. खांडवापर्यंतचे काम काही कारणांमुळे रखडलेले असल्याने पूर्ण झालेल्या अकोला ते अकोटपर्यंतच्या मार्गावर तरी रेल्वेगाडी धावावी, अशी अपेक्षा अकोट शहर व तालुक्यातील जनतेची आहे. नोव्हेंबर महिन्यात विभागीय व्यवस्थापक उपविंदर सिंग अकोला येथे आले असता, ‘लोकमत’ने हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी अकोट येथील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण होईपर्यंत अकोटपर्यंत रेल्वेगाडी जाऊ शकत नसल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले होते. पूल नसल्याने अकोला ते अकोट मार्गावरील वाहतूक अवरुद्ध होईल, असे कारण त्यावेळी सिंग यांनी पुढे केले होते.
आता या पुलाचे काम पूर्ण झाले असून, अधिकृतरित्या या पुलाचे हस्तांतरण झाले नसले, तरी यावरून वाहनेही धावत आहेत. लवकरच हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे विभागीय व्यवस्थापक याकडे लक्ष देऊन तरी अकोटपर्यंत रेल्वे सुरू करतात का, याकडे लक्ष लागले आहे.
डेमूचे स्वप्न राहिले अपूर्ण
गतवर्षी पूर्णा ते अकोलादरम्यान डेमू गाडी सुरू करण्यात आली होती. ही गाडी अकोटपर्यंत प्रस्तावित होती, परंतु प्रत्यक्षात ती अकोलपर्यंतच धावली. काही दिवस सुरळीत चालल्यानंतरही ही गाडी पॅसेंजरमध्ये परिवर्तित करण्यात आली. त्यामुळे अकोटकरांचे डेमू गाडीचे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.
अकोट-अकोला रस्त्याने प्रवास नको रे बाबा
सध्या अकोला ते अकोट रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने या रस्त्याने जाणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गत अनेक वर्षांपासून अत्यंत धिम्या गतीने हे काम सुरू आहे.