शिवसेना जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यामध्ये खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:26 PM2019-03-12T13:26:58+5:302019-03-12T13:27:11+5:30
अकोला: जिल्हा परिषदेच्या निधीच्या मािहतीवरून शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील सोनवणे यांच्यात सोमवारी संध्याकाळी चांगलाच वाद झाला.
अकोला: जिल्हा परिषदेच्या निधीच्या मािहतीवरून शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील सोनवणे यांच्यात सोमवारी संध्याकाळी चांगलाच वाद झाला. कार्यकारी अभियंत्याने वाडेगाव येथील सरपंच पुत्राच्या खिशातील रोकड हिसकल्याचा आरोप या युवकाने केला. या वादातच कार्यकारी अभियंत्यांच्या टेबलवरील काचावर देशमुख यांनी हात मारल्याने काच फुटल्याने हे प्रकरण सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात पोहाचले. एकीकडे अधिकारी-कर्मचारी संघटना, तर दुसरीकडे शिवसैनिकांची गर्दी झाल्याने रात्री ११ वाजताच्या सुमारास हे प्रकरण आपसात मिटविण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा परिषदेत बांधकाम विभागाकडून निधी खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे; मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने प्रक्रिया थांबली. सोमवारी संध्याकाळी शिवसेना सदस्य नितीन देशमुख बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता सुनील सोनवणे यांच्या कक्षात गेले. देशमुख यांनी सोनवणे यांना नियोजनाबाबतची मािहती मागितली; मात्र सोनवणे यांनी सीईओंचे नाव पुढे करीत मािहती देण्यास नकार दिला. परिणामी दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातच कक्षातील टेबलवर ठेवण्यात आलेली काच फुटली. त्यामुळे हे प्रकरण पोलीस, नंतर सीईओ आयुष प्रसाद यांच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्याशी चर्चा केली. कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात झालेल्या वादाची उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने यांनी बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मािहती जाणून घेतली. यावेळी कार्यकारी अभियंता सुनील सोनवणेदेखील होते. नितीन देशमुख व सुनील सोनवने यांच्यात वाद झाल्यानंतर दोघेही पोलीस ठाण्यात तक्रार देत असतानाच वाडेगाव येथील एका युवकानेही सोनवने यांनी १० हजार रुपये हिसकल्याची तक्रार देण्यासाठी पुढाकार घेतला; मात्र जिल्हा परिषद सदस्य व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण आपसात करण्यात आले.
शिवसैनिकांची घोषणाबाजी आरसीपी तैनात
जिल्हा परिषदेत झालेल्या वादाची मािहती मिळताच शिवसैनिकांनी थेट सिटी कोतवाली पोलीस स्टेशनलामध्ये धाव घेतली. शिवसैनिकांची संख्या वाढल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आरसीपीचे जवान तैनात करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी घोषणा दिल्या. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने हे कक्षातून बाहेर आले. त्यांनी शिवसैनिकांना घोषणा न देण्याचा आणि या प्रकरणाला वेगळे वळण न देण्याचा सल्ला दिला.