किशोर खत्री हत्याकांडाचा निकाल ११ सप्टेंबरला;दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 02:42 PM2018-08-29T14:42:46+5:302018-08-29T14:45:00+5:30
अकोला: शहरातील प्रसिद्ध व्यवसायी तथा उद्योजक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात मंगळवारी पूर्ण झाली. या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
अकोला: शहरातील प्रसिद्ध व्यवसायी तथा उद्योजक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात मंगळवारी पूर्ण झाली. या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. उज्ज्वल निकम यांनी २१ साक्षीदार तपासले असून, त्यामधील दोन साक्ष महत्त्वाच्या असल्याचे सांगण्यात आले.
खोलेश्वर परिसरात निर्माणाधीन असलेल्या बालाजी मॉलच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून किशोर खत्री यांची सोमठाणा शेत शिवारामध्ये ३ नोव्हेंबर २०१५ रोजी बंदुकीच्या गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. किशोर खत्री यांचे बंधू दिलीप खत्री यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रणजितसिंह चुंगडे, अंकुश चंदेल व राजू मेहेर व निलंबित पोलीस कर्मचारी जस्सी ऊर्फ जसवंत सिंह चौहान यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनात तपास केल्यानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर न्यायालयात आरोपींविरुद्ध हत्या करणे, पुरावे नष्ट करणे यासारखे आरोप ठेवण्यात आले; मात्र आरोपींनी हत्या केली नसल्याचे न्यायालयासमोर सांगितले. त्यानंतर साक्ष-पुरावे न्यायालयात झाले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद सुरू असतानाच सरकार पक्षातर्फे तब्बल २१ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर बचाव पक्षाच्या वतीने मिर्झा व दिलदार खान यांनी युक्तिवाद केला. त्याला अॅड. निकम यांनी उत्तरे दिली असून, मंगळवारी या हत्याकांडाची सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांनी या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. उज्ज्वल निकम यांनी तर आरोपींच्यातीने अॅड. वसीम मिर्झा, अॅड. दिलदार खान व अॅड. हातेकर यांनी कामकाज पाहिले.