दुर्धर आजार रुग्णांना मदतीसाठी अर्जांची पडताळणी रेंगाळली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:56 AM2021-01-08T04:56:26+5:302021-01-08T04:56:26+5:30
अकोला : दुर्धर आजार रुग्णांना १५ हजार रुपयांची मदत देण्याच्या योजनेंतर्गत प्राप्त अर्जांची पडताळणी करण्याची प्रक्रिया रेंगाळल्याच्या मुद्दयावर जिल्हा ...
अकोला : दुर्धर आजार रुग्णांना १५ हजार रुपयांची मदत देण्याच्या योजनेंतर्गत प्राप्त अर्जांची पडताळणी करण्याची प्रक्रिया रेंगाळल्याच्या मुद्दयावर जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सोमवारी गाजली.
दुर्धर आजार रुग्णांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत देण्याची योजना जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. परंतु, योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी अद्याप पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे दुर्धर आजार रुग्णांना मदतीच्या रकमेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे या मुद्यावर नाराजी व्यक्त करीत, अर्जांची पडताळणी अद्याप का करण्यात आली नाही, अशी विचारणा सदस्यांनी सभेत केली. त्यानुषंगाने अर्जांची पडताळणी तातडीने करून, दुर्धर आजार रुग्णांना तातडीने मदत वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश जिल्हा परिषद आरोग्य विभागाला या सभेत देण्यात आले. जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या मुद्दयांवरही सभेत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कृषी समितीच्या सभेत
योजनांच्या मुद्दयावर चर्चा!
जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत सोमवारी कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या मुद्दयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोरणात्मक निर्णय किंवा ठराव न घेता, कृषी विभागाच्या योजनांवर सभेत चर्चा करण्यात आली. कृषी सभापती पंजाबराव वडाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.