शहरातील मालमत्तांची होणार पडताळणी

By Admin | Published: April 18, 2017 01:39 AM2017-04-18T01:39:53+5:302017-04-18T01:39:53+5:30

पथकांचे केले गठन; उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न

Verification of the properties in the city | शहरातील मालमत्तांची होणार पडताळणी

शहरातील मालमत्तांची होणार पडताळणी

googlenewsNext

अकोला : बाजार मूल्यानुसार अकोलेकरांच्या मालमत्ता करात ८० टक्के दरवाढ केल्यानंतर आता महापालिकेने शहरातील मालमत्तांची नव्याने पडताळणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचा सर्व्हे करणाऱ्या स्थापत्य कन्सलटन्सीच्या कामाची पडताळणी करण्यासह शहरातील मालमत्तांची मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना इत्थंभूत माहिती होण्यासाठी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी हा निर्णय घेतला. उपायुक्त समाधान सोळंके यांच्या मार्गदर्शनात पथकांचे गठन करण्यात आले आहे.
मनपाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रशासन धोरणात्मक निर्णयांवर अंमलबजावणी करीत असल्याचे दिसून येते. मनपाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता करात मागील पंधरा वर्षांपासून कोणतीही दरवाढ न झाल्यामुळे प्रशासनाची आर्थिक नाक ाबंदी झाली आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनीदेखील मतांच्या राजकारणापायी मालमत्ता कराच्या दरामध्ये वाढ होऊ न देण्याची आजवर भूमिका घेतली. त्याचा परिणाम मनपाच्या विविध योजनांवर होण्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही झाला. आजवर मालमत्ता कर विभागाच्या दप्तरी ७४ हजार मालमत्ताधारकांची नोंद होती. त्यापासून केवळ १६ ते १८ कोटी रुपये वार्षिक कर वसुली होत असे. ही रक्कम अतिशय तोकडी असल्यामुळे प्रशासनाने नोव्हेंबर २०१६ मध्ये ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे शहरातील मालमत्तांचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला. स्थापत्य कन्सलटन्सीला मालमत्तांचे सर्वेक्षण व संगणकीकृत नोंदी करण्याचे काम देण्यात आले. कंपनीच्या सर्व्हेनुसार नवीन प्रभाग वगळून शहरात १ लाख ५ हजाराच्या आसपास मालमत्तांची नोंद करण्यात आली आहे.
कंपनीचे कामकाज अंतिम टप्प्यात असून, प्रशासनामार्फत मालमत्ताधारकांना सुधारित कराच्या नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानुषंगाने कंपनीने केलेल्या सर्व्हेची तसेच मालमत्तांची मनपाच्या स्तरावर पडताळणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

पथकांना केले रवाना
पूर्व झोनमध्ये पडताळणीसाठी १२ पथकांना उपायुक्त समाधान सोळंके यांनी मार्गदर्शन केल्यानंतर त्यांना पुढील कामासाठी रवाना करण्यात आले. याप्रसंगी पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, कर अधीक्षक विजय पारतवार, सहायक कर अधीक्षक नंदकिशोर उजवणे, स्थापत्य क न्सलटन्सीचे अधिकारी, मनपाचे अभियंता, कर्मचारी उपस्थित होते.

पडताळणी कशासाठी?
२४ एप्रिलनंतर अकोलेक रांना सुधारित कर प्रणालीच्या नोटिस जारी करण्याचे काम सुरू होणार आहे. नागरिकांकडून आक्षेप नोंदविल्या जाण्याची शक्यता आहे. अशावेळी कंपनीच्या सर्व्हेची तसेच शहरातील मालमत्तांची प्रत्यक्षात पाहणी केलेली माहिती मनपाच्या मालमत्ता विभागाकडे असावी, असा आयुक्त अजय लहाने यांचा उद्देश आहे.

उपायुक्तांच्या मार्गदर्शनात पथकांचे गठन
मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्या मार्गदर्शनात एकूण १२ तपासणी पथकांचे गठन करण्यात आले असून, त्यामध्ये स्थापत्य क न्सलटन्सीचे कर्मचारी, मनपाचे अभियंता, कर वसुली लिपिकांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात पूर्व झोनमधील मालमत्तांची पडताळणी केली जाईल. यासाठी पथकांना तीन दिवसांचा वेळ देण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित तीन झोनमधील मालमत्तांची तपासणी होईल.
--

Web Title: Verification of the properties in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.