अमरावती विभागातील माध्यमिकच्या विशेष शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:28 PM2018-12-08T12:28:28+5:302018-12-08T12:28:52+5:30
अकोला: अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या विशेष शिक्षकांची शैक्षणिक पात्रता व इतर कागदपत्रांची शासनाच्या आदेशानुसार विभागनिहाय पडताळणी करण्यात येत आहेत.
अकोला: अपंग समावेशित शिक्षण योजना अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या विशेष शिक्षकांची शैक्षणिक पात्रता व इतर कागदपत्रांची शासनाच्या आदेशानुसार विभागनिहाय पडताळणी करण्यात येत आहेत. शिक्षण संचालनालयाच्या चार विशेष पथकांनी अकोल्यात पाच ते सहा दिवस राहून अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील विशेष शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली. यात सर्वाधिक अमरावती जिल्ह्यातील १00 व अकोला जिल्ह्यातील २८ शिक्षकांचा समावेश आहे. यासंदर्भातील अहवाल विशेष पथकांचे अधिकारी शासनाकडे सादर करणार आहेत.
इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने २00९ मध्ये देशभरामध्ये अपंग समावेशित शिक्षण योजना सुरू केली. या योजनेसाठी शासकीय माध्यमिक शाळा, खासगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये संस्थेच्या माध्यमातून विशेष शिक्षक व परिचरांची नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्ती करताना, शैक्षणिक पात्रतेसह, जात प्रमाणपत्र, आरक्षणाचा विचार करण्यात आला की नाही, यात काही घोळ तर झाला नाही ना, असा संशय येत असल्यामुळे शासनाने राज्यात अपंग समावेशित शिक्षण योजनेंतर्गत नियुक्त विशेष शिक्षकांची शैक्षणिक पात्रता व इतर कागदपत्रांची विभागनिहाय पडताळणी सुरू केली आहे. अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील विशेष शिक्षकांना अकोल्यात बोलावून त्यांची एका अज्ञात ठिकाणी चौकशी आणि कागदपत्रांची पडताळणी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यासाठी शिक्षण विभागाला वेळापत्रक देण्यात आले होते. अकोल्यात शिक्षण संचालनालयाच्या चार विशेष पथकांनी २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत पडताळणी केली. (प्रतिनिधी)
यात कोणी बोगस शिक्षकाची नियुक्ती झाली आहे का, नियुक्तीदरम्यान काही घोळ झालेला आहे, याची तपासणी विशेष पथकांच्या माध्यमातून करण्यात आली. याबाबत तपशीलवार माहिती देता येणार नाही.
-अंबादास पेंदोर, शिक्षण उपसंचालक
अमरावती विभाग.