खामगाव वन परिसरात अतिशय दुर्मीळ ‘गडगळ्या’ कंद आढळला!
By admin | Published: June 28, 2016 01:57 AM2016-06-28T01:57:01+5:302016-06-28T01:57:01+5:30
खामगाव वन परिसरात अत्यंत दुर्मीळ औषधी वनस्पती असलेला गडगळय़ा कंद आढळून आला आहे.
अनिल गवई/ खामगाव (जि. बुलडाणा)
विजेच्या कडकडाटानंतर उमलणारा आणि आयुर्वेदात औषधी गुणधर्म असलेला अतिशय दुर्मीळ असा 'गडगळ्या'कंद खामगाव वन परिसरात आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात हा कंद कुतुहलाचा विषय बनला असल्याचे दिसून येते.
नैसर्गिक वनस्पतींपैकी काही वनस्पती या निसर्ग चक्रानुसार उमलतात. तसेच त्यांची वाढही निसर्ग चक्रावर अवलंबून असते. या वनस्पती अतिशय दुर्मीळ असल्याने, सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. त्यामुळे दुर्मीळ वनस्पतींकडे कुणाचे फारशे लक्ष नसते; मात्र जाणकार आणि वनस्पती तज्ज्ञ दुर्मीळ वनस्पतीच्या कायम शोधात असतात. पावसाळा लागल्यानंतर डोंगराळ भागासह वनांमध्ये अनेक दुर्मीळ वनस्पतींची उत्त्पती होते. दरम्यान, काही वनस्पती या विजेच्या कडकडाटानंतरही उमलतात. यामध्ये 'गडगळ्या' कंद यापैकीच एक असून महाराष्ट्रातील अतिशय दुर्मीळ प्रजातीमध्ये याची गणना होते. पुणे परिसरातील लोणावळा, खंडाळा येथील जंगलात हा कंद आढळून येतो. पुणेरी भाषेत त्याला 'कडकड्या', 'वीजकुट्या' संबोधल्या जात असल्याची माहिती वनस्पती तज्ज्ञांनी दिली. दरम्यान, अतिशय दुर्मीळ वनस्पती असलेला हा 'गडगळ्या' कंद खामगाव येथील पक्षी मित्र तथा वनस्पती तज्ज्ञ संजय गुरव यांना तालुक्यातील बोथा जंगलात आढळून आला आहे.
मशरूमच्या प्रजातीत समावेश!
सुमारे ७-८ इंचापर्यंंत हा कंद वाढतो. हा कंद मशरूमच्या प्रजातीत मोडत असून, मे महिन्याच्या अखेरीस ते जून महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात आलेल्या पावसात अनेक प्रकारचे मशरूम प्रकारातील कंद उगवतात. यापैकी बहुतांश कंदाचा खाण्यासाठी वापर केला जातो. तसेच दुर्मिळ औषधी गुणधर्मही या कंदात आढळतात. दरम्यान, हृदयविकार आणि रक्तवाहिन्यासंबधी विकार, दाहक आतडी रोग आणि कर्करोगावर औषध म्हणून उपयोगी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.