ज्येष्ठ साहित्यिक संताेष काेकाटे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:14 AM2021-05-03T04:14:09+5:302021-05-03T04:14:09+5:30
अंकुर साहित्य संघाचे जिल्हा सचिव व विदर्भ प्रमुख ही अत्यंत महत्त्वाची पदे सांभाळत अंकुरला फुलविण्यात संताेष काेकाटे यांचा ...
अंकुर साहित्य संघाचे जिल्हा सचिव व विदर्भ प्रमुख ही अत्यंत महत्त्वाची पदे सांभाळत अंकुरला फुलविण्यात संताेष काेकाटे यांचा सिंहाचा वाटा आहे़ त्यांनी कसदार लेखन करून संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी छाप टाकत नावलौकिक मिळवला हाेता़ माणसं जोडायची अन् पुढे चालत राहायचे हे त्यांचे काम होते़ त्यामुळे साहित्य विश्वात त्यांनी खूप मोठे नाव कमावले़ अस्सल वऱ्हाडी कवितेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन हास्य विनोदाच्या माध्यमातून जनतेचे प्रबोधन त्यांनी केले़ त्यांची ‘कुत्तरकी’ ही कविता महाराष्ट्रात गाजली़ त्यांच्या ‘सगुण’ या कवितेच्या माध्यमातून अंधश्रद्धेवर प्रहार करून जनजागृती केली़
ते ‘सगुण’ या कवितेत असं लिहितात की,
तू पाह्यत राहिली सगुण
लोकं चंद्रावर गेले निघून
अंगारे केले भंडारे केले
गावातले रिकामे जेऊन गेले
तू घासत बसली भगुणं
लोकं चंद्रावर गेले निघून ....
अशा कवितेने प्रबोधन तर केलेच पण श्रोत्यांची मने जिंकली़ त्यांचा जीवन प्रवास फार खडतर होता़ त्यांनी सुरुवातीला लोकांची कामे करून आपलं जीवन काढलं. दोन मुलांचे शिक्षण पूर्ण केले़ आता आनंदाचे जीवन जगण्याची वेळ आली तेव्हा किडनीसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले हाेते़ जवळपास बरेच दिवसांपासून ते किडनी आजाराशी झुंज देत होते़ शेवटी मृत्यूशी झुंज देत असताना आज ते अपयशी ठरले़ त्यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातू असा बराच मोठा आप्त परिवार आहे़