बाळापूर मतदारसंघात दिग्गजांची दावेदारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 03:56 PM2019-07-03T15:56:47+5:302019-07-03T15:58:29+5:30
काँग्रेस, शिवसेना, भाजपा अन् शिवसंग्राम या पक्षाचे जिल्हाध्यक्षच या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी करीत असल्याने दिग्गजांमध्ये स्पर्धा आहे.
- राजेश शेगोकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युती व आघाडी गृहीत धरून सध्या या दोन्ही पक्षांच्या घटक पक्षांमध्ये मतदारसंघ मिळविण्यासाठीच स्पर्धा सुरू झाली आहे. अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघ हा अशा सर्वाधिक प्रबळ दावेदारीचा मतदारसंघ आहे. युतीमध्ये भाजपाकडे असलेल्या या मतदारसंघावर शिवसेनेसह शिवसंग्रामचाही दावा आहे, तर आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या या मतदारसंघात आता राष्ट्रवादीची दावेदारी प्रबळ ठरली आहे. विशेष म्हणजे, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा अन् शिवसंग्राम या पक्षाचे जिल्हाध्यक्षच या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी करीत असल्याने दिग्गजांमध्ये स्पर्धा आहे.
२०१४ च्या निवडणुकीत अकोल्यातील पाचपैकी चार मतदारसंघ जिंकणाऱ्या भाजपाला या मतदारसंघात विजय मिळविता आला नाही. खरेतर ही जागा युतीमध्ये शिवसंग्रामला देण्यात आली होती; मात्र जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणामुळे ही जागा ऐनवेळी भाजपाला देण्यात आली, त्यामुळे शिवसंग्रामचे संदीप पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवत भाजपाच्या मतांना खिंडार पाडले. दुसरीकडे माजी आमदार नारायण गव्हाणकर हेसुद्धा स्वतंत्रपणे रिंगणात राहिल्याने त्यांनी शिवसंग्रामच्या खालोखाल मते घेतली. मतांच्या या विभाजनाला शिवसेनेच्या उमेदवारानेही हातभार लावला. एवढ्या मोठ्या प्रमाणात मत विभाजन झाल्याने परंपरागत काँग्रेसचा बुरूज ढासळला अन् मोदी लाटेतही भाजपाची नाव तरली नाही. मुस्लीमबहुल मतदारसंघ असल्यामुळे काँग्रेसने नातीकोद्दीन खतीब यांना उमेदवारी दिली तर भाजपाने तेजराव थोरात यांना रिंगणात उतरविले; मात्र या दोन्ही दिग्गजांना भारिप-बमसंचे बळीराम सिरस्कार यांनी धूळ चारत विजय मिळविला. आता हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी युती व आघाडी मोर्चेबांधणी करीत आहेत.
‘वंचित’ची खेळी निर्णायक ठरणार!
बाळापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असलेले आमदार बळीराम सिरस्कार यांना लोकसभा निवडणुकीत बुलडाण्यात उमेदवारी देण्यात आली होती. ते पराभूत झाले. बुलडाण्यासारख्या नव्या मतदारसंघात केवळ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशामुळे त्यांनी निवडणूक लढविण्यास संमती दिली. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल, असे मानले जात आहे. तसे झाले तर सिरस्कार यांना एन्टीइन्कम्बन्सीचा सामना करावा लागेल. दुसरीकडे वंचितची काँग्रेससोबत आघाडी झाल्यास पुन्हा समीकरणे नव्याने मांडली जातील. त्यामुळे वंचित काय करणार, यावरही या मतदारसंघाचे भवितव्य ठरणार आहे. हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी युती व आघाडीत स्पर्धा रंगणार आहे.
काँग्रेस, राष्टÑवादीत गर्दी
या मतदारसंघात काँग्रेसने नेहमीच मुस्लीम मतांचे गणित मांडले त्यातूनच माजी आ. नातीकोद्दीन खतीब यांना उमेदवारी दिली; मात्र लागोपाठ दोन वेळा हे गणित हुकल्यामुळे आता मुस्लिमेतर उमेदवार देण्यासाठी पक्षश्रेष्ठींपर्यंत दबाव वाढविला जात आहे. काँग्रेसमध्येच या मतदारसंघात इच्छुकांची दावेदारी मोठी आहे. खतीब हे पतसंस्थेच्या प्रकरणात अडचणीत आल्यामुळे त्यांचे पुत्र ऐनोद्दीन खतीब यांचे नाव पुढे केले जात आहे, तर प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे व प्रकाश तायडे यांनीही मतदारसंघात मोर्चेबांधणी केली असल्याने त्यांचाही दावा प्रबळ आहे. या पृष्ठभूमीवर आता राष्टÑवादीचे नेतेही या मतदारसंघावर दावा करीत आहेत. राष्ट्रवादीकडून खुद्द जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे हेच या मतदारसंघासाठी इच्छुक असल्याने जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून प्रतिष्ठेचा केला जाऊ शकतो. त्यांच्यासोबतच शिवाजीराव म्हैसने यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
युतीमध्ये सारेच सक्रिय
पराभूत झाल्यानंतरही भाजपाचे उमेदवार तेजराव थोरात यांनी जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत या मतदारसंघातील सक्रियता कायम ठेवली.
शिवसेनेचे जि.प. सदस्य नितीन देशमुख यांनी सेनेचे जिल्हाप्रमुख झाल्यावर या मतदारसंघात सेनेची बांधणी करून आपली दावेदारी प्रबळ केली आहे, तर शिवसंग्रामचे संदीप पाटील यांनीही मतदारसंघातील सक्रियता कायम ठेवत मतदारसंघ आपल्यालाच मिळेल, असा आशावाद जिवंत ठेवला आहे.
यासोबतच माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनीही कंबर कसली असल्याने या मतदारसंघावर पक्षाच्या दाव्यासह उमेदवारीचीही मोठी स्पर्धा आहे.