पशुवैद्यकीय रुग्णालय आता रात्री ८ वाजतार्यंत राहणार उघडे !
By admin | Published: February 19, 2016 01:46 AM2016-02-19T01:46:29+5:302016-02-19T01:46:29+5:30
अकोल्याच्या स्नातकोत्तर पशुविज्ञान संस्थेचा उपक्रम राज्यात पहिला.
अकोला: शेतकरी, पशुपालकांकडील जनावरांना पशुवैद्यकीय सेवा सुलभ व तत्पर मिळावी, याकरिता अकोल्याच्या स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान संस्थेने रात्री ८ वाजतापर्यंत रुग्णसेवा सुरू केली आहे. जनावरांना अचानक होणारे आजार, अपघात यावर येथे तातडीने उपचार केले जात असून राज्यातील हा पहिला प्रयोग मानला जात आहे.
महाराष्ट्र पशुविज्ञान विद्यापीठाची अकोल्यात स्नातकोत्तर पशुवैद्यकीय मत्स्य व विज्ञान संस्था आहे. या संस्थेत पशू, जनावरांच्या दुर्धर आजारांवर उपचार केले जातात. दुर्धर आजार व अवघड शस्त्रक्रिया येथे केल्या जातात. सर्वच प्रकारच्या जनावरासंबंधी येथे संशोधनही केले जाते. या संस्थेने भाकड गायीमध्ये प्रजननक्षमता वाढविण्यासाठी ऋतूनियमाचे संशोधन केले असून, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाला हे संशोधन सुपूर्द केले. यासाठी पशुधन विकास मंडळाने या संस्थेला निधी उपलब्ध करू न दिला होता. जनावरांच्या आरोग्यावर होणारे खार्या पाण्याचे दीर्घ परिणाम यावरही या संस्थेत संशोधन करण्यात आले आहे. इतर शेतकर्यांच्या पशुधनासाठी पूरक कार्यक्रम येथे घेतले जात असून, पशुपालन कसे करावे याबाबतचे प्रशिक्षणही देण्यात येत असते.
दरम्यान, शेतकरी दिवसभर शेतात व्यस्त असल्याने ते जनावरांना रुग्णालयात आणू शकत नाही, अनेक वेळा अपघात व इतर आजारही जनावरांना होतात; पण रात्री रुग्णालयच उघडे राहत नसल्याने शेतकर्यांना त्यांच्याकडील जनावरांना खासगी पशुवैद्यकीय तज्ज्ञाला दाखवावे लागते. खासगी पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे शुल्क शेतकर्यांना परवडत नाही आणि वेळेवर तज्ज्ञ मिळेल याची शाश्वती नसते त्यामुळे जनावरांचा मृत्यू होण्याचे प्रकार घडतात. या सर्व पार्श्वभूमीवर स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व मत्स्य विज्ञान संस्थेने रुग्णालय रात्री ८ वाजतापर्यंत सुरू केले आहे. या रुग्णालयात अद्ययावत सर्व उपकरणे असून, जनावरांच्या प्रत्येक आजारावर येथे पशू रुग्णसेवा उपलब्ध आहे.