धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणुकीने वेधले लक्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 03:42 PM2017-10-01T15:42:35+5:302017-10-01T15:45:01+5:30
अकोला: अश्वांवर स्वार झालेले भीमसैनिक, नीळ्या रंगाचे फेटे परिधान केलेले युवक, हातामध्ये पंचशील ध्वज आणि ढोलताशांचा निनाद, जय भीमचा जयघोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवारी दुपारी शहरातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.
रेल्वे स्टेशन चौक परिसरातून रविवारी दुपारी धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या प्रारंभी अश्वांवर स्वार झालेले समता सैनिक दलाचे सदस्य होते. पंचशील ध्वज हातात घेऊन जय भीमच्या घोषासह मिरवणूक पुढे निघाली.
जिल्हाभरातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असलेले युवक, युवती, महिला पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून बहुसंख्येने मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आखाडा व व्यायाम शाळेचे सदस्य लाठीकाठी, चक्र, तलवारबाजी, मल्लखांबसारखे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करीत होते. प्रात्यक्षिक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. युवक, युवती हातात लेझिम घेऊन मिरवणुकीसमोर नृत्याचा फेर धरीत होत्या. हातात निळे ध्वज हातात घेऊन भीमसैनिक पुढे सरकत होते. रेल्वे स्थानक, शिवाजी पार्क, होमिओपॅथी महाविद्यालय चौक, मनकर्णा प्लॉट चौक, शहीद अब्दुल हमीद चौक, रिगल टॉकिज मार्गावर ठिकठिकाणी भीमसैनिकांच्या स्वागतासाठी स्टॉल उभारण्यात आले होते.
मिरवणुकीत सहभागी झालेल्या भीमसैनिकांना सामाजिक व राजकीय संघटनांच्यावतीने मसालाभात, पोहे, पुरीभाजीचे वितरण करण्यात आले. मिरवणूक मार्गावरील चौका-चौकांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा आणि पुतळे उभारण्यात आले होते. या दोन्ही महामानवांच्या प्रतिमा, पुतळ्यांसमोर आकर्षक सजावट करण्यात आली होती.