कुलगुरू पदासाठी स्पर्धा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2017 01:54 AM2017-05-01T01:54:17+5:302017-05-01T01:54:17+5:30
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी याच कृषी विद्यापीठाचे आजी- माजी संचालक, शास्त्रज्ञ स्पर्धेत उतरले आहे.
पंदेकृविच्या आजी-माजी शास्त्रज्ञांचा समावेश
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी याच कृषी विद्यापीठाचे आजी- माजी संचालक, शास्त्रज्ञ स्पर्धेत उतरले आहे. सध्या कार्यरत अधिष्ठाता कृषी डॉ. विलास भाले या स्पर्धेत पुढे असल्याचे वृत्त आहे.
या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ येत्या आॅगस्ट महिन्यात संपणार आहे. त्या दृष्टीने तीन महिने अगोदर कुलगुरू पदाची निवड करण्यासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून, राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांनी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश हेमंत गोखले यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली आहे. समिती राज्यपालांच्या विचारार्थ कुलगुरूपदा साठी योग्य व्यक्तींच्या नावाची यादी सादर करणार आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पदुम विभागाचे प्रधान सचिव बिजय कुमार समितीचे अन्य सदस्य असतील. दरम्यान, या कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी डॉ. विलास भाले यांच्यासह काही माजी संचालक,वरिष्ठ शास्त्रज्ञांचा समावेश आहे. यामध्ये डॉ. विजय माहोरकर तसेच एक माजी कुलसचिव व माजी संशोधन संचालकाचा समावेश असल्याचे वृत्त आहे.