संवेदनाशून्य कारभाराने घेतला महिलेचा बळी
By admin | Published: June 28, 2016 02:30 AM2016-06-28T02:30:50+5:302016-06-28T02:30:50+5:30
सर्पदंश झालेला रुग्णही उपचाराविना; विष प्राशन केलेल्यांवर चार तासानंतर उपचार.
सचिन राऊत / अकोला
बाश्रीटाकळी तालुक्यातील वरखेड वाघजळी येथे विषारी औषध प्राशन केलेल्या महिला व युवकास तसेच टिटवा येथील एका इसमास सर्पदंश झाल्याने त्यांना सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले; मात्र वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने या तिघांवरही तब्बल ४ तासानंतर उपचार सुरू केल्याने महिलेचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या बेताल आणि संवेदनशून्य कारभारामुळे महिलेचा बळी गेला तर युवकाची प्रकृती चिंताजनक आहे.
वरखेड-वाघजळी येथील रहिवासी शालूबाई गौतम करवते (३५) व त्यांचा पुतण्या विक्की विलास करवते (२७) या दोघांनी सोमवारी सायंकाळी विष प्राशन केले. त्यामुळे या दोघांनाही उपचारासाठी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दोघांनाही अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले; मात्र या ठिकाणचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नैताम यांच्यासह डॉ. घोरपडे, डॉ. डवंगे, डॉ. अपेक्षा मालविया हे एकही उपस्थित नसल्याने या दोघांवर रात्री ११ वाजेपर्यंत कोणतेही उपचार करण्यात आले नाही. या प्रकाराची माहिती आ. रणधीर सावरकर यांना मिळताच त्यांनी सवरेपचार रुग्णालय गाठून अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांना या प्रकाराबाबत विचारणा केली; मात्र कार्यकर्ते यांनी सदर प्रकारावर आ.सावरकर यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली. ७ वाजता दाखल केलेल्या रुग्णांवर रात्री १0 वाजेपर्यंत प्राथमिक उपचारही करण्यात न आल्याने शालूबाई करवते यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या सावरकरांनी युवकावर तातडीने उपचार करण्यात यावे यासाठी बहुतांश डॉक्टरांना फोन करून उपचार करण्यास सांगितले; मात्र डॉक्टर रुग्णालयात उपस्थित नसल्याचे दिसून आले. टिटवा येथील रहिवासी मारोती गंगाराम गावंडे यांना सर्पदंश झाल्याने त्यांनाही रुग्णालयात आणण्यात आले; मात्र डॉक्टरच नसल्याने त्यांनाही उपचाराविना खुर्चीवर बसविण्यात आले. सवरेपचारमध्ये रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप आ. सावरकर यांनी केला. तीन ते चार तास रुग्णांवर प्राथमिक उपचारही होत नसल्याने अनेकांचा मृत्यू होत असून रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तसेच गंभीर व अतिदक्षता विभागातील रुग्णांसाठी अधिष्ठात डॉ. राजेश कार्यकर्ते पर्यायी व्यवस्था करीत नसल्याचे दिसून आले. सवरेपचारमध्ये रुग्णांवर उपचार करण्यास डॉक्टर वेळेत हजर नसल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. नेहमीच प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या खांद्यावर रुग्णांचा कारभार चालविण्याचे प्रयत्न सुरू असल्याने रुग्ण त्यांचे नातेवाईक व डॉक्टरांमध्ये हाणामारी झाल्याचे प्रकार घडले आहेत.