‘डर के आगे जीत हैं’; संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाने १७ जणांना वाचविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:18 AM2021-07-26T04:18:51+5:302021-07-26T04:18:51+5:30
गजानन वाघमारे बार्शीटाकळी : जिल्ह्यात बुधवार व गुरुवारी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्हा जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. ...
गजानन वाघमारे
बार्शीटाकळी : जिल्ह्यात बुधवार व गुरुवारी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्हा जलमय होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेकांच्या घरात पाणी शिरले, तर अनेकजण पुरात अडकले होते. अशा स्थितीत गुरुवार, २२ जुलैच्या रात्री १२ वाजतापासून ते सकाळी १० वाजेपर्यंत संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने जीवाची बाजी लावत रेस्क्यू करून १७ जणांचा जीव वाचविला. पथकास २५ जुलैपर्यंत ‘स्टँड बाय’ राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहेत.
अपुऱ्या साधनसुविधा असूनही एकाच रात्री पूर परिस्थितीला सामोरे जाऊन मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी कार्यतत्परता दाखवित १७ लोकांना जीवदान दिले आहे.
सात तासांच्या कालावधीत दोनद नाला, आमराई नाला, खोलेश्वर स्मशानभूमी, विद्रुपा नदी येथील ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले. त्यानंतर खडकी येथे रेस्क्यू ऑपरेशन राबवून सेठी हाईटस, श्रद्धा काॅलनी, ३० बंगले येथील कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, एसडीएम डाॅ. नीलेश अपार, तहसीलदार अरखराव, संतोष अग्रवाल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे उपस्थित होते.
-----------------
यांनी लावली जीवाची बाजी!
पूर परिस्थिती काळात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी जीवरक्षक पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्यासह सहकारी ऋषीकेश राखोंडे, मयूर सळेदार, विकी साटोटे, अंकुश सदाफळे, महेश साबळे, ऋतीक सदाफळे, सचिन बंड, आकाश बगाडे यांनी जीवाची बाजी लावली. त्यांच्या कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी मीना अरोरा यांनी २३ जुलै रोजी सर्व पथकाचे कौतुक केले आहे.
------------------------------------
आमची पूर्वतयारी आणि सज्जता स्टँडबाय राहते. त्यामुळे अशाप्रकारे कोणत्याही अचानकपणे उद्भवणाऱ्या आपत्कालीन घटनांविषयी तारांबळ उडत नाही. त्यामुळेच आपत्ती निवारण करून यश मिळवतो. सध्या आम्हाला रेस्क्यू साहित्यांची गरज आहे.
-दीपक सदाफळे, जीवरक्षक.