विदर्भात ९६६ शिक्षक पदे रिक्त, शिक्षक भरतीतून पदे भरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 02:28 PM2019-02-13T14:28:02+5:302019-02-13T14:28:21+5:30
अकोला: निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये एकूण ९६६ पदे रिक्त आहेत.
- नितीन गव्हाळे
अकोला: निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये एकूण ९६६ पदे रिक्त आहेत. ही पदे शिक्षक भरतीतून भरली जाण्याची शक्यता आहे. शिक्षक भरतीमध्ये पात्र शिक्षकांना संधी मिळणार आहे. शिक्षण विभागाने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे म्हटले होते; परंतु अद्यापपर्यंत जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. त्यामुळे शिक्षक भरती होईल की नाही, याबाबत सांशकता आहे.
शिक्षक भरतीवरील बंदी उठवित राज्य शासनाने राज्यातील अंदाजे २0 हजार रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून शिक्षक भरतीची शिक्षकांमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे. शिक्षक भरती घेण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या असून, पवित्र पोर्टलवर शिक्षण संस्थांची बिंदुनामावली, रिक्त पदे, जातीचा संवर्ग अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये शिक्षण संस्थांची बिंदुनामावली शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयांकडे पाठविण्यात आली होती. या संस्थांची बिंदुनामावली सर्व शिक्षणाधिकाºयांच्या माध्यमातून विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाकडे तपासणीसाठी पाठविली होती. विदर्भात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या ९६६ जागा रिक्त असल्यामुळे या जागा शिक्षक भरतीद्वारे भरण्यात येण्याची शक्यता आहे. खासगी शिक्षण संस्थांच्या शाळेत सरळसेवेने पदभरती करण्याच्या दृष्टिकोनातून सुधारित बिंदुनामावलीही शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. शिक्षक भरती करताना मुलाखतीसह नियुक्तीपत्र देण्याचे अधिकार शासनाने शिक्षण संस्थांना दिले आहेत; मात्र शिक्षण संस्थांना गुणवत्तेच्या आधारे निवड पात्र शिक्षकांची निवड बंधनकारक राहणार आहे.
विदर्भातील शाळांमधील रिक्त जागा!
अकोला- ८९
अमरावती- १७४
नागपूर- १२१
यवतमाळ- १४१
बुलडाणा- १४८
वाशिम- ४९
वर्धा- ६५
भंडारा- ८३
गोंदिया- ३२
चंद्रपूर- ४८
गडचिरोली- १६