लॉकडाऊनला विदर्भ चेेंबरचा तीव्र विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 10:20 AM2021-04-07T10:20:15+5:302021-04-07T10:20:22+5:30
Vidarbha Chamber of commerce : व्यापार बंद करण्याऐवजी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी विदर्भ चेंबर व व्यापारी संघटनांकडून करण्यात आली आहे.
अकोला: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने ‘ब्रेक दी चैन’ अंतर्गत मीनी लॉकडाऊन घोषित केला आहे. या लॉकडाऊनला विदर्भ चेंबरने तीव्र विरोध दर्शविला आहे. राज्य शासनाने लॉकडाऊनचे आदेश त्वरित रद्द करावे, तसेच व्यापार बंद करण्याऐवजी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी विदर्भ चेंबर व व्यापारी संघटनांकडून करण्यात आली आहे. विदर्भ चेंबरने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, कोरोना संसर्गामुळे व्यापारी हैराण झाले आहेत. एकीकडे रेल्वे, एसटी बसेसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, कोविड चाचणी केंद्र परिसरात होणारी गर्दी, विनामास्क नागरिकांचा मुक्त संचार करणाऱ्यांवर शासनाचे दुर्लक्ष होत आहे, तर दुसरीकडे व्यापारी प्रतिष्ठाणमधून कोरोना पसरतो म्हणून दुकाने बंद करण्यात आली आहेत. स्थानिक नागरिकांना रोजगार पुरविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक निर्बंध राज्य सरकारने लावले आहेत. चार आठवड्यांच्या लॉकडाऊनमुळे अनेक किरकोळ, छोटे प्रतिष्ठाणे बंद होण्याची भीती आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांच्या समस्या वाढणार आहेत. त्यामुळे विदर्भ चेंबरने सर्व व्यापारी संघटनांची ॲानलाईन बैठक घेतली असून, या बैठकीत लॉकडाऊन हा सर्वसामान्यांवर अन्याय करणारा असल्याचा सूर उमटला आहे. राज्य सरकारने लॉकडाऊनचे आदेश रद्द करावे, तसेच व्यापार बंद करण्याऐवजी कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने सूचीत केलेल्या निर्देशनांच्या अनुपालनावर शासनाने भर द्यावा, असे प्रतिपादन करण्यात आले, अशी माहिती विदर्भ चेंबर आणी सर्व व्यापारी संगठनांतर्फे अध्यक्ष नीतीन खंडेलवाल, उपाध्यक्ष निकेश गुप्ता, उपाध्यक्ष आशिष चंदराणा, मानद सचिव विवेक डालमिया, कोषाध्यक्ष किशोर बाछुका, सहसचिव राहूल गोयनका यांनी दिली आहे.