विदर्भातून थंडी गायब; दोन दिवसांपासून किमान तापमानात अल्पशी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:51 PM2018-11-24T12:51:31+5:302018-11-24T12:51:37+5:30
अकोला: नोव्हेंबर महिना संपत आला, तरी विदर्भात अपेक्षित थंडी नाही. गत दोन दिवसांपासून किमान तापमानात अल्पशी घट जाणवत असली, तरी हरभरा व गहू पिकासाठी बऱ्यापैकी थंडीची गरज आहे
अकोला: नोव्हेंबर महिना संपत आला, तरी विदर्भात अपेक्षित थंडी नाही. गत दोन दिवसांपासून किमान तापमानात अल्पशी घट जाणवत असली, तरी हरभरा व गहू पिकासाठी बऱ्यापैकी थंडीची गरज आहे. दरम्यान, मागील चोवीस तासांत शुक्रवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर येथे १३.० अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
यावर्षी पाऊस कमी झाला. आता थंडीही गायब झाली आहे. मागच्या आठवड्यात ढगाळ वातावरण होते. परिणामी, किमान तापमान २१ ते २२ अंशांपर्यंत वाढले होते. गत दोन दिवसांपासून यात घट झाली असली, तरी अपेक्षित थंडी नाही. मागील चोवीस तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्टÑाच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली, तर विदर्भाच्या काही भागात किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
मागील चोवीस तासांत किमान तापमान अकोला येथे १६.३ नोंदविण्यात आले, तर अमरावती १६.६, बुलडाणा १८.६, चंद्रपूर १९.६, गोंदिया १४.४, वर्धा १५.०, यवतमाळ येथे १६.० अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली. राज्यात अलिबाग २२.०, डहाणू २३.४, पुणे १५.४, अहमदनगर १३.६, जळगाव १७.२, कोल्हापूर २०.७, मालेगाव १८.८, नाशिक १६.८, सांगली १८.६, सातारा १७.१, सोलापूर १७.६, औरंगाबाद १४.०, परभणी १४.९, नांदेड १६.० नोंद करण्यात आली आहे.
हरभरा, गहू पिकासाठी थंडीची गरज
विदर्भात कोरडवाहू हरभरा, तेलबिया पिकांसह गहू पीक घेतले जाते. यातील हरभरा पिकाला थंडीची गरज असते. समप्रमाणात थंडी असल्यास या पिकाची वाढ होते. यावर्षी पाऊस कमी झाल्याने थंडीची नितांत गरज असल्याने शेतकरी चांगल्या थंडीच्या प्रतीक्षेत आहेत.