विदर्भातील गुंतवणूकदारांना दहा कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 14:47 IST2019-07-26T14:47:07+5:302019-07-26T14:47:14+5:30
विदर्भातील ११ जिल्ह्यात लहान गुंतवणूकदारांची दहा कोटींची रक्कम धोक्यात सापडल्याची शंका बाजारपेठेतील तज्ज्ञ दलाल व्यक्त करीत आहेत.

विदर्भातील गुंतवणूकदारांना दहा कोटींचा फटका
- संजय खांडेकर
अकोला : शेअर बाजारातील नामांकित कंपन्यांचे शेअर सातत्याने कोसळत असल्याने शेअर्सच्या किमती वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमी होत आहेत. यामुळे लहान गुंतवणूकदारांची मूळ रक्कमच बाजारात अडकली आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यात लहान गुंतवणूकदारांची दहा कोटींची रक्कम धोक्यात सापडल्याची शंका बाजारपेठेतील तज्ज्ञ दलाल व्यक्त करीत आहेत.
बाजारपेठेतील मंदीमुळे गत काही महिन्यांपासून शेअर बाजारातील नामांकित कंपन्यांचे शेअरचे दर मोठ्या प्रमाणात खाली घसरत आहे. कमी झालेले शेअरचे दर पुन्हा उसळतील, या आशेने लहान गुंतवणूकदार ब्रॅण्डेड कंपनीच्या मोहात पडून गुंतवणूक करीत आहेत; मात्र आहे ते दर देखील आता कंपनी टिकवू शकत नाही, ही स्थिती स्पष्ट झाली आहे. पै-पै करून जमविलेली लहान गुंतवणूदारांची मूळ पुंजीच आता धोक्यात आल्याने लहान गुंतवणूकदार धास्तावले आहेत. विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावतीसह अकरा जिल्ह्यातील लहान गुंतवणूकदारांना याचा किमान दहा कोटींचा जबर आर्थिक फटका बसला आहे.
शेअर बाजारातील घसरणीचे कारण
क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेणे आणि व्यावसायातील गुंतवणूक फसणे हे शेअर बाजार घसरणीचे दोन महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे अनेक नामांकित कंपन्या तोट्यात आल्या आहेत. त्याचा फटका सामान्य आणि लहान गुंतवणूकदारांना सोसावा लागत आहे.
नामांकित कंपन्यांचे शेअर दर कमी होताच अनेक जण भाववाढ होण्याच्या मोहात पडून लहान गुंतवणूकदार मोहात पडत आहेत. ही स्थिती आजही आहे. ज्या कंपन्या गेल्या तीन वर्षांत आपल्या शेअर होल्डर्सला लाभांश देऊ शकले नाही, त्या कंपनीची ग्रोथ होऊ शकली नाही. त्या कंपनींच्या शेअरमध्ये गुंतवणूक किती जोखमीची आणि सावधगिरीची आहे, याचा गुंतवणूकदारांनी विचार करावा.
- हंसराज अग्रवाल, ब्रोकर, शेअर मार्केट, अकोला.