विदर्भात आता व्यावसायिक, शास्त्रोक्त कुक्कुटपालन !
By admin | Published: March 11, 2016 02:48 AM2016-03-11T02:48:22+5:302016-03-11T02:48:22+5:30
राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून एक कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार.
अकोला: कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी आता व्यावसायिक, शास्त्रोक्त पद्धतीने कोंबडीपालन कार्यक्रम राबविण्यावर शासनाने लक्ष केंद्रित केले असून, विदर्भातील शेतकर्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवता यावे, यासाठीचे कुक्कुटपालनाचे अर्थशास्त्र व तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणावर राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून एक कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. कुक्कुटपालन व्यवसायाला चांगला वाव असून, कमी खर्चात चांगले उत्पन्न देणार्या या व्यवसायाचा ग्रामीण भागात प्रसार करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने कोंबडीपालन केले जात आहे. म्हणूनच व्यावसायिक पद्धतीने कुक्कटपालनावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
कुक्कुटपालन करताना अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते. यामध्ये लहान पिल्लांचे संगोपन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोंबड्याना होणारे आजार, त्यावरील उपचार, लसीकरण, कोंबड्यांना लागणारे खाद्य व त्याची निर्मिती अशा अनेक बाबी महत्त्वाच्या आहेत. आपल्याकडे मात्र व्यवसाय म्हणून कोंबडीपालन केले जात नसल्याने या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले जाते; तथापि शेतीला हा अत्यंत पूरक व्यवसाय असल्याने तो वृद्धिंगत होणे गरजेचे असल्याने पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयामार्फत शेतकर्यांना शास्त्रोक्त कुक्कुटपालन प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला असून, स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ शेतकर्यांना प्रशिक्षण देत आहेत. आतापर्यंत ५00 शेतकर्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ८ मार्च रोजी एका तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, १४ मार्च रोजी दुसरे प्रशिक्षण सुरू होत आहे.
पश्चिम विदर्भातील खारपाणपट्टय़ातील अतिशय अल्कधर्मी व खार्या पाण्यामुळे या भागातील पशुधन आणि कोंबड्यांना गंभीर स्वरू पाचे आजार होत असल्याचे प्राथमिक संशोधनातून पुढे आले आहे. या सर्व परिस्थितीची माहिती शेतकर्यांना मिळाल्यास या भागात कुक्कुटपालन व्यवसाय वाढून शेतकर्यांना चांगले उत्पन्न मिळवता येईल. यासाठीच या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत एक कोटी रुपये शासनाने स्नातकोत्तर पशुवैद्यकीय, पशुविज्ञान संस्थेला दिले आहेत.