विदर्भातील ४० टक्क्यांवर उत्पादन घटणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:16 PM2019-07-26T12:16:11+5:302019-07-26T12:16:20+5:30
विदर्भातील जवळपास २० ते २५ लाख हेक्टरवरील पिकांना धोका निर्माण झाला असून, यावर्षी ४० टक्क्यांवर उत्पादनात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
- राजरत्न सिरसाट
अकोला : मान्सून विलंबाने आल्याने पेरणीस उशीर झाला; अल्प पावसात पेरण्या सुरू असतानाच पुन्हा चार आठवडे पावसाने दडी मारल्याने विदर्भातील जवळपास २० ते २५ लाख हेक्टरवरील पिकांना धोका निर्माण झाला असून, यावर्षी ४० टक्क्यांवर उत्पादनात घट होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
राज्यात आजमितीस ८० टक्क्यांवर पेरण्या आटोपल्या आहेत. विदर्भातील अमरावती विभागात ९३ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. तथापि, नागपूर विभागातील चित्र वेगळे आहे. या विभागातील सात लाख हेक्टरवर शेतकरी धान पीक घेतात; परंतु पाऊसच नसल्याने यातील ६० टक्के क्षेत्रावरील धान पिकाची रोवणी रखडली आहे. दोन्ही विभागात धानासोबतच सोयाबीन, कापूस पेरणीच क्षेत्र प्रत्येकी १५ लाख हेक्टर आहे. गळीत, तृण, कडधान्य मिळून विदर्भात खरीप हंगामातील ४९ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीलायक आहे; परंतु आजमितीस कोरडवाहू क्षेत्रावरील पीक शेवटच्या घटका मोजत आहे. त्यामुळे पाऊस आला तरी खुंटलेल्या पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण असल्याने हजारो शेतकऱ्यांना अर्ध रब्बी, रब्बी पिकांचे नियोजन करण्याची वेळ आली आहे. पुण्याच्या कृषी आयुक्तालयानेदेखील यासाठीचे आपत्कालीन पीक नियोजन केले आहे. ३१ जुलैपर्यंत पेरणी करायची असल्यास संकरित बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन अधिक तूर, बाजरी अधिक तूर, एरंडी अधिक धने (मिश्र पीक ) यासारखी पिके कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार घेण्याचा सल्ला दिला आहे. १ ते १५ आॅगस्टपर्यंत एरंडी, तीळ, संकरित बाजरी, रागी, एरंडी अधिक धने मिश्र पिके घ्यावीत, १६ ते ३१ आॅगस्टपर्यंत अशीच पिके घ्यावीत तथापि कापूस, ज्वारी, भुईमूग ही पिके घेऊ नयेत, असेही सल्ला देताना म्हटले आहे. दरम्यान, असे सर्व असले तरी शेतकरी आताच गलितगात्र झाला असून, त्याच्याकडे पैसाच नसल्याने दुबार पेरणी करणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मूग, उडीद हातचा गेला!
धान, मूग, उडिदाचे पीक हातचे गेल्यात जमा आहे. सोयाबीन तग धरू न होते; मात्र आता त्याचीही वाट लागली आहे. कापसाची वाढ खुंटली असून, ज्वारीचेही पीक करपले आहे.
- पाऊसच नसल्याने विदर्भातील २० ते २५ लाख हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर्षी ४० टक्क्यांवर उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
डॉ. शरद निंबाळकर,
माजी कुलगुरू ,
डॉ. पंदेकृवि, अकोला.