अवकाळीच्या तडाख्यानंतर वऱ्हाड पुन्हा तापले!
By रवी दामोदर | Published: April 17, 2024 08:37 PM2024-04-17T20:37:18+5:302024-04-17T20:38:25+5:30
वाशिम जिल्ह्याचा पारा विदर्भातून अव्वल, तर अकोला, बुलढाण्याच्या तापमानात वाढ.
अकोला : गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण होऊन तापमानाचा पारा खाली उतरला होता. परंतू आता वातावरण कोरडे झाले असून, पुन्हा उन्हाचा पारा चढत असल्याचे चित्र आहे. तापमान सतत वाढत असून वऱ्हाड तापले आहे. बुधवार, दि. १७ ए्प्रिल रोजी वाशिम जिल्ह्याचा पारा विदर्भातून सार्वाधिक ४२.२ अंशावर होता. तर अकोला जिल्हा ४२.१ अंशावर होता. त्यामुळे दुपारच्या सुमारास तिन्ही जिल्ह्यांमध्ये शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.
पश्चिम वऱ्हाडात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील सोंगणीला आलेले पीक, उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. दरम्यान एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापायला सुरुवात झाली असल्याने अवकाळी पावसामुळे तापमानाचा पारा काहीअंशी घसरला होता. आता पुन्हा पारा वाढला असून, दुपारच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. दरम्यान, ग्रामीण भागातही शेतकऱ्यांकडून सकाळच्या सुमारासच काम केल्या जात असल्याचे पहावयास मिळत आहे.
असे आहे तापमान
जिल्हा - कमाल - किमान
वाशिम - ४२.२ - २६.४
अकोला - ४२.१ - २५.२
बुलढाणा - ४०.२ - २७.५