विदर्भ राज्य आंदोलन समिती लढविणार विदर्भातील सर्व जागा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:27 PM2019-01-05T12:27:50+5:302019-01-05T12:27:56+5:30
विदर्भातील लोकसभेच्या तसेच विधानसभेच्या सर्व जागा लढविणार असल्याची माहिती विदर्भ राज्य समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
अकोला : विदर्भ राज्याची मागणी सातत्याने होत आहे. या मागणीची दखल काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांच्या सरकारांनी घेतली नाही. आश्वासन देऊनही विदर्भ राज्य निर्मिती पूर्ण होऊ शकली नाही; मात्र आम्ही हिंमत हारली नसून, विदर्भ राज्य देता की जाता, असा सवाल भाजप सरकारला करणार असून, विदर्भातील लोकसभेच्या तसेच विधानसभेच्या सर्व जागा लढविणार असल्याची माहिती विदर्भ राज्य समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
विदर्भ राज्य आंदोलन समितीने अनेक वर्षांपासून विदर्भ राज्याची मागणी आतापर्यंत सत्तेत आलेल्या सरकारला केली होती. तसे आश्वासनही निवडणुकीपूर्वी देण्यात आले; मात्र सत्ता हाती येत गेली, मागणी रेंगाळत गेली; परंतु आता सरकारला धडा शिकविण्याशिवाय पर्याय नाही. विदर्भ राज्य हवे असेल, तर मैदानात उतरावेच लागेल, असा निर्धार करीत विदर्भ राज्य आंदोलन समितीने २ जानेवारीपासून नागपूर येथून विदर्भ राज्य निर्माण यात्रेला प्रारंभ केला आहे. ही यात्रा शुक्रवारी पोहोचली असता, पत्रकार भवन येथे संवाद साधला. ही यात्रा १२ जानेवारीपर्यंत विदर्भात फिरणार असून, नागपूर येथे समारोप होईल. यामध्ये भाजप सरकारला आठ प्रश्नांची उत्तर मागितले जाणार आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केव्हा करणार, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती केव्हा करणार, उत्पादन खर्चासह ५० टक्के नफा मिळण्याच्या हिशेबाने शेतमालाला भाव देण्याची घोषणा कधी करणार, ग्रामीण भागातील लोडशेडिंग केव्हा संपविणार, सर्व वैदर्भीय जनतेसाठी विजेचे दर निम्मे केव्हा करणार, शेती पंपाचे विजेचे देयक केव्हा संपणार, अल्प बचत गटावरील मायक्रो फायनान्स कर्ज केव्हा संपविणार, दोन कोटी तरुणांना दरवर्षी नोकºया केव्हा देणार, या मागण्यांचा समावेश राहील. पत्रपरिषदेला सुरेश जोगळे, माधवराव गावंडे, घनश्याम पुरोहित, रंजना मामर्डे, ललित बहाळे, सतीश देशमुख, अविनाश नाकट, डॉ. नीलेश पाटील व धनंजय मिश्रा उपस्थित होते.