विदर्भात २६ जुलैपासून तीन दिवस पावसाची शक्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 04:14 PM2019-07-24T16:14:31+5:302019-07-24T16:14:46+5:30
अकोला : विदर्भात येत्या २६ ते २८ जुलैपर्यंत तीन दिवस चांगला पाऊस येण्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.
- राजरत्न सिरसाट
अकोला : विदर्भात येत्या २६ ते २८ जुलैपर्यंत तीन दिवस चांगला पाऊस येण्याची शक्यता कृषी हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. हा वर्तविण्यात आलेला अंदाज आशादायक असला तरी यावर्षी पावसाचा दीर्घ खंड पडल्याने विदर्भासह राज्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. या अनुषंगाने कृषी आयुक्तालयाने तातडीची बैठक घेऊन नवीन आपात्कालीन पीक नियोजन केले.
राज्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाने बऱ्यापैकी मान्सूनचा अंदाज वर्तविला होता. तथापि, यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. राज्यात पश्चिम महाराष्टÑातील कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यात सरासरी एवढा पाऊस झाला. कोकणात सर्वच जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली; परंतु उर्वरित मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्टÑात अद्याप दमदार पाऊस झाला नाही. विदर्भातील बहुतांश भागात दमदार पाऊसच झाला नसल्याने हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मे महिन्यात रोहिणी नक्षत्र सुरू झाले. ७ जून रोजी पावसाळा सुरू झाला. तथापि, २३ जूनपर्यंत शेतकºयांना मान्सूनची प्रतीक्षा करावी लागली. तेव्हापासून पावसाचा सारखा खंड पडत असून, विदर्भात अनेक भागात पेरण्या उलटल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील पिकांवर याचा जास्त परिणाम झाला आहे.
पावसाच्या या अनियमिततेच्या अनुषंगाने कृषी आयुक्तालय पुणे येथे मंगळवार,२२ जून रोजी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला भारतीय कृषी संशोधन परिषदेचे हैद्राबाद येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ के.व्ही.राव, डॉ.के. गोपीनाथ, राज्यातील कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ, कृषी संचालक विजय घावट, आत्माचे संचालक अनिल बनसोडे, राज्यातील सर्व विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती. येथे जिल्हावार पाऊसमान व पीक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला, तसेच ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या नाहीत त्यांच्यासाठी ३१ जुलै व त्यानंतर १ ते १५ आॅगस्ट आणि १६ ते ३१ आॅगस्टपर्यंत शेतकºयांनी कोणती पिके घ्यावीत, याचे आपात्कालीन पीक नियोजन करण्यात आले.
मान्सूनचे वारे पूर्वेकडून पश्चिमकडे वाहत असून, हे पावसासाठीचे चांगले संकेत मानण्यात येत आहेत. त्यामुळे येत्या २६ ते २८ जुलै रोजी विदर्भात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.
डॉ. आर.एन.साबळे,
ज्येष्ठ कृषी हवामान शस्त्रज्ञ, पुणे.