विदर्भात सरासरीपेक्षा सहा टक्के कमी पाऊस!
By admin | Published: June 24, 2017 04:43 AM2017-06-24T04:43:05+5:302017-06-24T04:43:05+5:30
वाशिम, बुलडाणा जिल्ह्यात सामान्यपेक्षा जास्त पाऊस
राजरत्न सिरसाट ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : विदर्भात जून महिन्यात २३ जूनपर्यंंंंत पडणार्या एकूण पावसापैकी सरासरीपेक्षा सहा टक्के कमी पाऊस झाला आहे. याची तीव्रता नागपूर जिल्हय़ात अधिक असून, येथे सामान्यपेक्षा ५५ टक्के कमी पाऊस आहे. बुलडाणा आणि वाशिम जिल्हय़ात सामान्यपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद नागपूरच्या हवामानशास्त्र विभागाने केली आहे.
विदर्भात १६ जून रोजी मान्सूनच्या पावसाने प्रवेश केला आहे; परंतु अचानक दडी मारल्याने जून महिन्यात पडणार्या पावसाची सरासरी घसरली आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाळी वातावरण तयार झाले होते, तसेच त्याअगोदर मान्सूनपूर्व पाऊस अधून-मधून सुरू च होता. राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या भाकिताप्रमाणे चांगला पाऊस येईल, अशी अपेक्षा होती; परंतु मान्सून आगमनाच्या सुरुवातीलाच पाऊस अचानक गायब झाला आहे.
दरम्यान, १ जूून ते २३ जूनपर्यंंंंंत विदर्भातील नागपूर जिल्हय़ात सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला असून, भंडारा जिल्हय़ातही हेच चित्र आहे. येथेही सामान्यपेक्षा ५0 टक्के पाऊस कमी आहे. गडचिरोली जिल्हय़ात ३७ टक्के कमी पाऊस असून, गोंदिया जिल्हय़ात सामान्यपेक्षा ३६ टक्के पाऊस कमी आहे. चंद्रपूर जिल्हय़ात सामान्यपेक्षा १0 टक्के कमी पाऊस झाला आहे. अमरावती जिल्हय़ात १५ टक्के कमी पाऊस आहे. विशेष म्हणजे, हे सर्व जिल्हे पावसाचे आहेत. वाशिम जिल्हय़ात मात्र सामान्यपेक्षा ६६ टक्के पाऊस अधिक झाला असून, बुलडाणा जिल्हय़ात अधिक पावसाचे प्रमाण हे ५२ टक्के आहे. यवतमाळ जिल्ह्यात २५ टक्के जास्त, अकोला जिल्हय़ात सहा टक्के, तर वर्धा जिल्हय़ात सामान्यपेक्षा चार टक्के पाऊस अधिक झाला आहे.
विदर्भात शुक्रवारी काही ठिकाणी पाऊस झाला आहे. अकोला जिल्हय़ातील काही भागात पाऊस पडला. मागील चोवीस तासांत अकोला येथे ६.0 मि.मी., ब्रम्हपुरी २.४ मि.मी., चंद्रपूर ५.0 मि.मी., गोंदिया १५.१ मि.मी., वर्धा ११.८ मि.मी., तर यवतमाळ येथे ६.६ मि.मी. पावसाची नोंद नागपूर हवामानशास्त्र विभागाने केली आहे.