विदर्भातील सोयाबीनचे उत्पादन घटले!
By admin | Published: March 17, 2015 01:08 AM2015-03-17T01:08:33+5:302015-03-17T01:08:33+5:30
बाजारात दरही पडले; बियाण्यांच्या टंचाईची शक्यता.
अकोला : विदर्भातील सोयाबीनचे उत्पादन ५0 टक्क्याच्या वर घसरले असून, बाजारात दरही पुरक मिळत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. पण उत्पादन घटले असताना दर वाढत नसल्याने शेतकर्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून, कमी उत्पादनाचा परिणाम यावर्षी बियाण्यांवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विदर्भात यावर्षी शेतकर्यांनी १५ लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी केली. पण, पाऊसच नसल्याने सोयाबीन उत्पादकांच्या हाती निराशा आली आहे. सोयाबीनचा उतारा एकरी ९ ते १0 क्विंटल येत होता, तो यावर्षी कमी झाल्याने उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे. या परिस्थितीत हमीभाव शेतकर्यांना तारतील, अशी अपेक्षा होती; परंतु हमीभावात यावर्षी प्रतिक्विंटल २५४0 च्या वर वाढ झाली नसून, बाजारात प्रतवारीनुसार उत्तम दर्जाच्या सोयाबीनला ३२४0 रुपये दर आहेत. या प्रतिचे सोयाबीन सिंचनाची सोय असलेल्या काही मोजक्याच शेतकर्यांकडे असेल; पण ९९ टक्केच्या वर शेतकर्यांकडे सिंचनाची सोय नव्हती. त्यामुळे या शेतकर्यांची यावर्षी बाजारात लूट होत आहे. २0१३-१४ ला अतवृष्टीने सोयाबीन काळे पडले तर २0१४-१५ मध्ये पाऊसच नसल्याने सोयाबीनचे बी बारीक झाले. त्यामुळे गतवर्षी सोयाबीन बियाण्यांसाठी शेतकर्यांना संघर्ष करावा लागला होता. बियाणे मिळाले; परंतु हजारो हेक्टरवरील बियाणे वांझ निघाल्याने शेतकर्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. कीटकनाशके फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढला. त्या तुलनेत उत्पादन मात्र झाले नाही. उत्पादन खर्च तरी निघेल, या अपेक्षेत शेतकरी असताना खासगी बाजारात सोयाबीनचे प्रतिक्विंटल भाव २९00 ते ३१00 रुपयांहून पुढे सरकलेले नाहीत. त्यातच प्रतवारीचे निकष लावून सोयाबीन खरेदी केले जात असून, या सोयाबीनला ३२४0 रुपये क्विंटलपर्यंत भाव दिला जात आहे. उर्वरित सोयाबीन मात्र २६00 ते ३000 हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी केले जात आहे. एकीकडे सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याचे सांगण्यात येते, तर दुसरीकडे बाजारात भाव पडले आहेत. या चक्रामुळे शेतकरी संभ्रमात सापडला आहे.