विदर्भात तुरळक पावसाची शक्यता !
By admin | Published: September 21, 2014 10:58 PM2014-09-21T22:58:24+5:302014-09-22T00:20:52+5:30
परतीच्या पावसाला वातावरण अनुकूल.
अकोला : महाराष्ट्राच्या पूर्व भागात वार्याची दिशा बदलून, वायव्येकडून होत आहे. त्यामुळे परतीच्या पावसासाठी वातावरण अनुकूल होत आहे. सध्या राजस्थानमध्ये पाऊस परतीला सुरुवात झाली असल्याचे वातावरण आहे. असे असले तरी येत्या २४ तासांत विदर्भात तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शनिवारी सकाळी ८.३0 वाजेपर्यंत वायव्य बंगालचा उपसागर आणि ओडिशाच्या किनार्यालगत असलेल्या पश्चिम -मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून, ते आता वायव्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या गंगेय पश्चिम बंगाल, ओडिशा, दक्षिण आंध्र प्रदेशच्या तटीय किनारपट्टी व पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत कोकण-गोवा व मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, शनिवार सकाळी ८.३0 वाजता विदर्भातील भामरागड व एटापल्ली येथे प्रत्येकी ४ सेंमी पावसाची नोंद झाली आहे. देवरी येथे ३ सेंमी, मुलचेरा २ सेंमी, अहिरी, कोरची, धानोरा, गोंडपिंपरी, मोताळा, चंद्रपूर व खांरग येथे प्रत्येकी १ सेंमी पावसाची नोंद झाली आहे.
उत्तर भारताच्या पश्चिम भागात म्हणजेच राजस्थानच्या भागातून प्रथम मान्सून बाहेर पडणार असून, दक्षिण दिशेकडून येण्यास सुरुवात होईल. त्यामुळे राजस्थानातील पाऊस थांबेल आणि पुढे सरकेल. सध्या राजस्थानच्या बर्याच भागातील पावसाचे वातावरण मोकळे झाले आहे. हेच परतीच्या पावसाचे लक्षण असल्याचे जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगीतले.