विकास हवा असेल तर विदर्भ राज्याची निर्मिती आवश्यक - आमदार आशीष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:54 AM2018-01-17T01:54:33+5:302018-01-17T01:54:53+5:30
अकोट : विदर्भाची सद्यस्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतकर्यांचे प्रश्न, शेतकर्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, वीज भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद आदी समस्या दूर करून विदर्भाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विदर्भ राज्याची निर्मिती आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : विदर्भाची सद्यस्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतकर्यांचे प्रश्न, शेतकर्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, वीज भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद आदी समस्या दूर करून विदर्भाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विदर्भ राज्याची निर्मिती आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.
काटोलचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांची आत्मबळ यात्रा १६ जानेवारी रोजी अकोट शहरात पोहोचली. स्थानिक राजमंगल सभागृहात आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी उपस्थितांशी व पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, की राज्यातील भाजप नेतृत्वातील सरकार सत्तेवर येऊन तीन वर्षे उलटली, तरी वर्हाड प्रांतातील अनेक कामे रखडलेली आहेत. फक्त अकोला जिल्ह्याचा विचार केला, तर शेतकरी कशीबशी शेती करीत आहेत. त्यांच्या पाठीशी सरकार उभे असल्याचे दिसत नाही. खारपाणपट्टय़ाचा प्रश्न तसाच आहे. अकोला जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. जिल्हा कापूस उत्पादक असला, तरी जिल्ह्यातील दोन्ही सूतगिरण्या बंद आहेत. जिल्हय़ात प्रक्रिया उद्योग नाहीत.
हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती होणे आवश्यक असल्याचे सांगून विदर्भ राज्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन विदर्भ आत्मबळ यात्रा यशस्वी करावी, असे आवाहन आमदार डॉ. देशमुख यांनी केले. अकोट येथील सभेनंतर ही यात्रा मुंडगाव येथे पोहोचली. येथेसुद्धा आमदार डॉ. देशमुख यांनी जनतेशी संवाद साधला.
वेगळ्या विदर्भाची मागणी करताच पक्षाची नोटीस
भाजपाने वेगळ्या विदर्भ राज्याचा ठराव घेतला होता. अशासकीय ठराव यापूर्वी अनेक वेळा मांडण्यात आलेत; मात्र अद्याप हालचाली नाहीत. त्यामुळे विदर्भ राज्याचा मुद्दा उपस्थित केल्याने पक्षाची नोटीस मिळाल्याची खंत यावेळी डॉ. देशमुख यांनी बोलून दाखविली. नोटीसचे उत्तर हे जनतेशी चर्चा करूनच देणार असल्याचे ते म्हणाले.