जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने विदर्भ वाईन शॉपला सील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:20 AM2021-09-21T04:20:48+5:302021-09-21T04:20:48+5:30
अकोला : अकोला शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या, गांधी चौकातील विदर्भ वाईन शॉप हेे दुकान परस्पर आपल्याच नावावर करण्याचा प्रयत्न ...
अकोला : अकोला शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या, गांधी चौकातील विदर्भ वाईन शॉप हेे दुकान परस्पर आपल्याच नावावर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका भागीदाराचा प्रयत्न हाणून पाडत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी १७ सप्टेंबर रोजी हे दुकान सील करण्याचा आदेश दिला.
दर्यापूर येथील अमित गावंडे, यांचे वडील मयत पुरुषोत्तम तुळशीराम गावंडे यांनी अकोल्यातील ब्रिजकिशोर जयस्वाल यांना भागीदारीत घेत महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबई यांनी देशी विदेशी दारू विक्रीचा परवाना (अनुज्ञप्ती) सन १९७३-७४ साली मिळविला होता. ब्रिजकिशोर जयस्वाल यांचा १९८७ साली मृत्यू झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परिपत्रकानुसार भागीदाराचा मृत्यू झाल्यावर, ब्रिजकिशोर यांची भागीदारी संपुष्टात आली. त्यानंतर ब्रिजकिशोर यांचे पुत्र राजेंद्र जयस्वाल यांना भागीदार म्हणून दाखविण्यात आले. त्यानंतर मूळ परवानाधारक पुरुषोत्तम तुळशीराम गावंडे यांचा सन २००० रोजी मृत्यू झाला. तेव्हा या देशी, विदेशी दारूच्या परवान्यातील भागीदार राजेंद्र ब्रिजकिशोर जयस्वाल यांनी मूळ परवाना पुरुषोत्तम तुळशीराम गावंडे, यांचे एकमेव वारस असलेले अमित पुरुषोत्तम गावंडे यांना अंधारात ठेवून, नमूद परवान्यावर मूळ परवानाधारक पुरुषोत्तम तुळशीराम गावंडे यांच्या वारसाचे नाव वगळून, स्वतःचे नाव चढविण्यासाठी राजेंद्र ब्रिजकिशोर जयस्वाल यांनी ३०/१०/२०१८ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग, अकोला येथे अर्ज दाखल केला. या अर्जावर मत घेण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालीन अधीक्षक राजेश कावळे यांनी, अमित गावंडे यांना नोटीस बजावली. त्यावेळी हा सर्व प्रकार अमित गावंडे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे न्यायासाठी रीतसर लढा सुरू केला. तीन वर्षांच्या लढाईनंतर जयस्वाल हे वारसाचे हक्क हडपण्याचा प्रकार करत असल्याचे समाेर आल्याने, विदर्भ वाईन शॉपच्या परवान्याचे नूतनीकरण करू नये, असे उत्पादन शुल्क विभागाला सांगून दुकान सील करून बंद करण्याचा आदेश दिला.