विदर्भातील पहिली मातृ दुग्धपेढी अकोल्यात होणार!
By admin | Published: September 22, 2015 01:01 AM2015-09-22T01:01:35+5:302015-09-22T01:01:35+5:30
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकाकडे प्रस्ताव.
नितीन गव्हाळे/अकोला: 0 ते ६ महिने वयोगटातील नवजात बाळाला अनेकदा आईचे दूध मिळत नाही. शिक्षित आईसुद्धा बाळाला दुधापासून वंचित ठेवून, त्याला गायीचं, म्हशीचं, पावडरचं दूध पाजते. नवजात बालकांना आईचं दूध सहजरीत्या उपलब्ध झालं पाहिजे, या उदात्त हेतूने विदर्भातील पहिली मातृ दुग्धपेढी अकोल्यात सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, या दुग्धपेढी निर्मितीसाठीचा प्रस्ताव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागामार्फत राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालकांकडे पाठविण्यात आला आहे. बाळ जन्मल्यावर सुरुवातीचे काही महिने स्तनदा माता बाळाला दूध देतात. नंतर मात्र चार चौघात बाळाला स्तनपान करताना त्यांना संकोचल्यासारखं वाटतं. काही प्रकरणांमध्ये आईला दूधच नसतं, या कारणांमुळे हळूहळू बाळाला गायीचं, म्हशीचं, पावडरचं दूध दिले जाते. आईचं दूध न मिळाल्याने बाळांची प्रकृती खालावते. बाळाची रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे, बाळाचा बुद्धय़ांक, भावनांकाचा विकास न होणे, वारंवार आजारी पडणं, वजन घटणं आदी समस्या निर्माण होतात. म्हणूनच की काय, नवजात शिशू मृत्यूदराचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. ज्या बाळांना आईचं दूध मिळत नाही, त्यांच्यासाठी मातृ दुग्धपेढी असावी, अशी संकल्पना वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी बालरोग विभागप्रमुख डॉ. विनीत वरठे, डॉ. ऊर्मिला देशमुख यांच्यासमोर मांडली. डॉ. वरठे, डॉ. देशमुख यांनीही त्यास सहमती दर्शवून त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला आणि वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालकांकडे पाठविला. या प्रस्तावाला वैद्यकीय संचालकांकडून मान्यता मिळेल, असा विश्वास डॉ. कार्यकर्ते यांनी व्यक्त केला. मान्यता मिळाल्यावर सहा महिन्यात अकोल्यातील वैद्यकीय महाविद्यालयात मातृ दुग्धपेढीच्या कामास सुरुवात होईल, अशी माहिती डॉ. कार्यकर्ते यांनी लोकमतला दिली.
काय आहे मातृ दुग्धपेढी?
बाळाला गरज असते, त्यापेक्षा अधिक दूध मातांना येते. अनेकदा माता दूध काढून फेकून देतात. त्यामुळे अशा मातांना दुग्धदानाविषयी प्रोत्साहित करून हे दूध मातृ दुग्धपेढीत जमा केले जाते. त्या दुधावर प्रक्रिया करून ते साठवले जाते आणि गरजू बालकांना हे दूध दिले जाते. जन्माला येणार्या मुलांपैकी अनेक मुले ही कमी वजनाची, मुदतपूर्व जन्माला आलेली असतात. अशा मुलांना दुधाची गरज असते, त्यांना पहिले सहा महिने आईचे दूध मिळाले तर त्यांची प्रकृती उत्तम राहते.