विदर्भाचा पैसा पश्चिम महाराष्ट्रा कडे वळता; दूध महासंघाची देयके रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:50 PM2018-12-04T12:50:06+5:302018-12-04T12:50:10+5:30
अकोला : विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दूध महासंघाची देयके देण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी पश्चिम महाराष्ट्रा कडे वळता करण्यात आल्याने येथील दूध महासंघाची देयके रखडली आहेत.
अकोला : विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दूध महासंघाची देयके देण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी पश्चिम महाराष्ट्रा कडे वळता करण्यात आल्याने येथील दूध महासंघाची देयके रखडली आहेत. अकोल्यात आता आपातकालीन निधी पाठविण्यात आल्याने यातून काही देयके अदा करण्याची वेळ शासकीय दूध योजनेवर आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रा तील काही दूध महासंघ, दूध उत्पादक शेतकरी प्रतिलिटर २० रुपये प्रमाणे दुधाची विक्री करतात. तथापि, हे दर परवडणारे नसल्याने तेथील दूध महासंघ, दूध उत्पादकांनी आंदोलन केली होती; त्यामुळे शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीदेखील केली. तथापि, निधीच उपलब्ध नसल्याने शासनाने त्यासाठी विदर्भाला मिळालेल्या वार्षिक तरतुदीतील पैसा पश्चिम महाराष्ट्रा कडे वळता केला. अकोला-वाशिम जिल्ह्यातील जवळपास दोन कोटीच्यावर ही रक्कम असल्याचे वृत्त आहे. याचा परिणाम मात्र येथील दूध महासंघ, दूध उत्पादकांवर झाला. दूध उत्पादकांची देयके देण्यासाठी शासकीय दूध योजनेकडे पैसाच उपलब्ध नसल्याने मागील नोव्हेंबर माहिन्याची देयके रखडली. परिणामी, दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याने शासकीय आकस्मिक निधी देण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, देयके थकल्याने अकोला व वाशिम जिल्ह्यासाठी आता १४ लाख रुपयांचा आकस्मिक योजनेतील निधी देयात आला आहे. अकोला- वाशिम जिल्ह्यात जवळपास ३० च्यावर दूध उत्पादक संस्था आहेत. या संस्था जिल्हा दूध संघाच्या महासंघाला दुधाचा पुरवठा करतात. महासंघ शासकीय दूध योजनेला दुधाचा पुरवठा करतो. म्हणूनच देयकांची जबाबदारी महासंघाची असते. आता आकस्मिक निधीतून सोमवारी आठ लाख रुपये देयकापोटी देण्यात आले असून, आणखी साडेपाच लाख रुपये वाटप करणे बाकी आहे.
आकस्मिक १४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, अकोला-वाशिम जिल्ह्यातील दूध उत्पादकांची थकलेली रक्कम दूध महासंघाला जवळपास आठ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. उर्वरित रक्कम मंगळवारी देण्यात येणार आहे; तसेच नवीन निधीदेखील लवकरच येणार आहे.
एस.आर.धर्माळे,
प्रभारी दुग्ध शाळा व्यवस्थापक,
शासकीय दूध योजना, अकोला.