विदर्भाच्या लाडक्या ‘शकुंतले‘चा लवकरच कायापालट होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 07:46 PM2017-12-04T19:46:25+5:302017-12-04T20:03:06+5:30
शतक ओलांडलेली पुरातन ब्रिटिशकालीन मूर्तिजापूर-यवतमाळ, मूर्तिजापूर-अचलपूर नॅरोगेज शकुंतला आता नव्या स्वरूपात प्रवाशांच्या भेटीला येणार आहे. यासाठी प्राप्त दीड हजार कोटींच्या निधीतून कामाला सुरुवात होणार आहे, असे माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर: शतक ओलांडलेली पुरातन ब्रिटिशकालीन मूर्तिजापूर-यवतमाळ, मूर्तिजापूर-अचलपूर नॅरोगेज शकुंतला आता नव्या स्वरूपात प्रवाशांच्या भेटीला येणार आहे. एकवेळी ही ऐतिहासिक गाडी बंद पडणार की काय, अशी चिन्हे दिसत असतानाच ही गाडी सुरूच राहावी, यासाठीदेखील भरभक्कम प्रयत्न करण्यात आले. त्याचीच फलश्रुती म्हणून आता ही गाडी नव्या रूपात प्रवाशांना बघायला मिळणार आहे, यासाठी प्राप्त दीड हजार कोटींच्या निधीतून कामाला सुरुवात होणार आहे, असे माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी कळविले आहे.
गरिबांची जीवन वाहिनी म्हणून शकुंतलेला ओळखले जाते. अचलपूर-मूर्तिजा पूर-यवतमाळ अशा या नॅरोगेज रेल्वेला आता ‘अच्छे दिन’ आले आहेत. स्वा तंत्र्योत्तर काळातही ब्रिटिश कंपनी क्लिक निक्सनच्या ताब्यात ही रेल्वे आहे. खा. भावना गवळी यांच्या प्रयत्नांनी या गाडीचा मार्ग ब्रॉडगेज होण्याचा मार्ग खुला झाला आहे. या कामासाठी तूर्तास या गाडीला विश्रांती देण्यात आली आहे. शासनाने गाडीचे रूपडे पालटण्यासाठी दीड हजार कोटींचा भक्कम निधी मंजूर केल्याने या कामाला गती प्राप्त झाली आहे. खा. भावना गवळी यांनी यासाठी संसदेसमोर एक याचिका सादर केली होती, हे विशेष.
१९१६ मध्ये क्लिक निक्सल अँड कंपनी या ब्रिटिश कंपनीने यवतमाळ-मू िर्तजापूर-अचलपूर-पुलगाव-आर्वी या तीन नॅरोगेज रेल्वे सुरू केल्या होत्या. आश्चर्य म्हणजे देश पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतरही या तिन्ही रेल्वे गाड्या ब्रिटिश कंपन्यांच्या ताब्यात होत्या. सुरुवातीला या रेल्वेचा वेग अतिशय मंद असल्याने या गाडीवर टीकाला झाली. आधी सुलोचना आणि नंतर शकुंतला या नावाने ही गाडी ओळखली जाऊ लागली.
असा आहे 'शंकुतले'चा इतिहास...
१९१६ मध्ये सुरू झालेली शकुंतला जवळपास ७0 वर्ष वाफेच्या इंजीनवर चालत होती. ११0 किलोमीटर अंतर कापायला शकुंतलेला तब्बल ११ तास लागत होते. नंतर ती डिझेल इंजीनवर धावू लागली. आता तिला याच प्रवासाला सहा तास लागतात. शकुंतलेचे उत्पन्न व खर्चाचा कुठेही मेळ बसत नाही. डिझेलच्या वाढत्या किमती, रेल्वे पायलट, गार्ड, स्टेशन मास्तर आणि कर्मचार्यांचे वाढते वेतन यामुळे ही रेल्वे प्रचंड तोट्यात होती. या रेल्वेच्या मार्गावरील जवळपास सर्वच स्थानके बंद पडली आहेत. आता मात्र शकुंतला नवीन रूपात समोर येणार, हे निश्चित झाले आहे.
ब्रॉडगेजच्या कामला डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये सुरुवात होणार आहे. या कामाचे भूमिपूजन मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर करायचे ठरविले आहे; मात्र याबात बैठकीत ठरवायचे आहे.
- भावना गवळी, खासदार